शहरात डेंगीचा उद्रेक, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव, मुख्य सभेत प्रशासनाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:18 AM2017-10-31T06:18:59+5:302017-10-31T06:19:06+5:30
शहरामध्ये डेंगीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून आतापर्यंत ४ हजार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे : शहरामध्ये डेंगीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून आतापर्यंत ४ हजार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशासनाकडून डेंगीचा आजार रोखण्यासाठी योग्य प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात न आल्याने नगरसेवकांनी
सोमवारी मुख्य सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
शहरात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळून येत असून त्याबाबत प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेतस याबाबत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले, की डेंगीचा प्रादुर्भाव नेमका कोणत्या भागात होतो आहे, हे कसे शोधायचे, हा प्रशासनासमोर प्रश्न होता. माझ्या दालनात अतिरिक्त आयुक्त शीतल उगले व आरोग्य अधिकाºयांसमवेत डेंगीबाबत झालेल्या बैठकीत पॅथॉलॉजी लॅब व हॉस्पिटलकडून दररोज डेंगीचा रिपोर्ट घेऊन त्यानुसार प्रतिबंधत्मक उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले? नायडू हॉस्पिटलमध्ये पुरेसा स्टाफ नाही.
झाडणकाम करणारे कर्मचारी काम न करता खोट्या सह्या करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन डेंगीसारख्या आजरांचे प्रमाण वाढत असल्याचे अमृता बाबर यांनी सांगितले.
अश्विनी कदम म्हणाल्या, ‘‘माझ्या घरात ३ डेंगीचे रुग्ण आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांना डेंगीची लागण झाली आहे. प्रशासनाकडून काहीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.’’
सचिन दोडके यांनी सांगितले, की आमच्या भागात बिल्डरांनी दोन-दोन एकरांचे खड्डे खोदून ठेवले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते आहे. या बिल्डरांना नोटिसा देण्यापलीकडे पालिकेकडून काहीच कारवाई करण्यात येत नाही.
याबाबत प्रशासनाकडून
खुलासा करताना सहायक आरोग्य अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘डेंगीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी डेंगीचा रुग्ण आढळतो, त्याच्या घराच्या आसपासच्या १०० घरांचा सर्व्हे करून तिथे डास उत्पत्ती केंद्रे आहेत का, याची तपासणी करण्यात येते.
डास उत्पत्ती केंद्र आढळून आलेल्या ६ हजार ५५८ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंगी रोखण्यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना न झाल्याचे आढळून आल्यास कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येत आहे.
सुभाष जगताप, हाजी गफूर पठाण, भैयासाहेब जाधव, चेतन तुपे, योगेस ससाणे यांनीही डेंगीच्या प्रश्नावर मत मांडले.
प्लेटलेटची व्यवस्था करावी
डेंगीच्या रुग्णांचे प्लेटलेट
कमी होऊन त्यांना त्याची आवश्यकता भासते. या प्लेटलेटसाठी रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो.
सर्वसामान्यांना हा खर्च
परवडत नाही. त्यामुळे महापालिकेकडून प्लेटलेट उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून या वेळी करण्यात आली.
भोंगा वाजवून
आयुक्तांचा निषेध
1 डेंगीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच निष्पन्न होत नाही, अशी टीका योगेश ससाणे यांनी केली.
2त्यानंतर त्यांनी अचानक भोंगा वाजविण्यास सुरुवात केली. या भोंगाच्या जोरात झालेल्या आवाजामुळे सभागृहातील पदाधिकारी व सर्व नगरसेवक अवाक् झाले.
3झोपलेल्या आयुक्तांना जागे करण्यासाठी भोंगा वाजवीत असल्याचे ससाणे यांनी या वेळी सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी ससाणे यांची या कृत्याबद्दल कानउघाडणी करून त्यांच्याकडील भोंगा जप्त करण्याचे आदेश दिले.