उरुळी कांचन येथील 'थ्री स्टार' मटका अड्डा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 03:25 PM2020-10-09T15:25:47+5:302020-10-09T15:29:54+5:30
ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुखांची बेधडक कारवाई ...
उरुळी कांचन : प्रशस्त पार्किंग, आराम करण्यासाठी सोफा, येणाऱ्या जाणाऱ्यांना थंड हवेसाठी नामांकित कंपन्यांचे कुलर, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे..पिण्यासाठी ब्रॅन्डेड कंपन्यांचे बिसलरी पाणी..हे वर्णन एखाद्या 'थ्री स्टार' हॉटेल अथवा रिसॉर्टचे नाही तर जेसीबीच्या साह्याने उध्वस्त केलेल्या उरुळी कांचन येथील 'थ्री स्टार' मटका अड्ड्याचे आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दत्तवाडीजवळ विकी कांचन याने मागील कांही दिवसापासुन भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका व जुगाराचा अड्डा सुरु केल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणी काळभोरचे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. देशमुख यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एस. के. रानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांनी गुरुवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विकी कांचन याच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
डॉ. अभिनव देशमुख यांनी ग्रामीण पोलीस अधिक्षक म्हणुन रुजु झाल्यापासुन जिल्ह्यातील प्रमुख पोलिस ठाण्यावर लक्ष केंद्रित करुन अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरु केला आहे. मागील आठ दिवसाच्या काळात सासवड, बारामती, शिरुर, भिगवणसह अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळु, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे. विशेष बाब म्हणजे कारवाई करताना, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेऊन कारवाई करण्यावर डॉ. देशमुख यांनी भर दिला आहे.