पुणे : पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनच (पीएमआरडीए) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पीएमआरडीएच्या विकास आराखड्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह तीन कॅन्टोन्मेंट क्षेत्रे वगळता जिल्ह्यातील ७ तालुके व ८५७ गावांचा पीएमआरडीएच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम २३ नुसार प्रस्तावित तब्बल ७ हजार ३५६ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्यात आलेला आहे. भविष्यातील गरजांचा यामध्ये विचार करण्यात येणार असून, विद्यमान जमीनवापर नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे. जवळपास १० सेंटिमीटरपर्यंतची स्पष्टता असलेले हवाई छायाचित्रण करण्यात आल्याने रिकाम्या जागा, टेकड्या, वळणे, विहिरी आदींची अचूक माहिती मिळू शकणार आहे.विकास आराखडा तयार करताना पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपालिका, सर्व गावठाणे यांच्या विकास आराखड्याच्या प्रती, हद्दींचे नकाशे, प्रदेश रस्ते जुळविण्यात येणार आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीतील काही गावे महापालिकांच्या हद्दीत गेल्यास हा विकास आराखडा अर्धवट होणार असल्याने तसेच त्याला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक असल्याने सर्वच गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएच तयार करणार आहे. पालिकेच्या हद्दीत जाणाºया गावांचा विद्यमान जमीनवापर नकाशा देण्यात येणार आहे. रिंगरोडसह त्यालगतच्या भागात करण्यात येणाºया नियोजित नगररचना योजनेसाठी या भागात पीएमआरडीएकडे नियोजन असणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास प्रकल्पात अडचणी येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित भागांचा विकास आराखडा पालिकांकडे हस्तांतरित केला जाईल.
विकास आराखडा पीएमआरडीएकडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 5:31 AM