पुणे : सरकार स्थापन करण्याच्या आधी, ते केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय धक्के दिले. आता ते पुन्हा एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्याच्या मागणीला त्यांनी मूक संमती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातीलच एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. आधीचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार होते. आताच्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणे योगायोग साधल्यासारखे होईल असे मजेने सांगत या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका निवडणूक, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असे मुद्दे फडणवीस यांच्यापुढे मांडले. ‘बरोबर आहे तुमचे’ अशा अर्थाने नेहमीसारखी मान हलवत त्यांनी मूक संमती दिली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूरहून पुण्यात आलेले व कोथरूड मतदारसंघातून आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अजूनही पुण्यात चाचपडत आहेत. त्यांना जिल्ह्याने किंवा पुणे शहरानेही स्वीकारलेले दिसत नाही. त्यामुळेच भाजपच्या पुणे गोटातही पाटील यांच्याबद्दल नाराजीचा सुप्त प्रवाह आहेच. पुणे शहरावरचे वर्चस्व कमी केले म्हणून खासदार गिरीश बापट हेही पाटील यांच्या विरोधातच असल्याचे दिसते. त्यामुळेच फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री होण्याबाबत आग्रह केला जात आहे.
तसेही मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पुण्याबद्दल नेहमीच विशेष प्रेम दाखवले आहे. पुणे महापालिकेसाठी स्वतंत्र बैठका आयोजित करण्याबरोबरच मागील अडीच वर्षे विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी पुण्याशी निगडित अनेक प्रश्नांवर थेट सरकारला धारेवर धरत कामांना, निर्णयांना गती द्यायला लावली. त्यांचा म्हणून पुणे शहरात आता एक स्वतंत्र गट तयार झाला आहे. त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह द्यायचा असेल तर त्यांच्याच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद ताब्यात ठेवणे गरजेचे आहे. त्या मानसिकतेतून फडणवीस तसा निर्णय घेऊ शकतात, असे भाजपतील काही ज्येष्ठांचे म्हणणे आहे.