दुर्मिळ साहित्याचे होणार डिजिटायझेशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:03 PM2018-05-15T13:03:48+5:302018-05-15T13:03:48+5:30

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे पुण्यातील चार संस्थांना यंदाच्या वर्षीपासून पाच लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

Digitization of rare literature | दुर्मिळ साहित्याचे होणार डिजिटायझेशन 

दुर्मिळ साहित्याचे होणार डिजिटायझेशन 

Next
ठळक मुद्देया संस्थांकडून जुनी पुस्तके, कागदपत्रे तसेच नियतकालिकांच्या डिजिटायझेशनवर भर देण्यात येणार

पुणे : मराठी भाषेचा समृध्द वारसा जतन करता यावा, प्रयोगशील उपक्रमांच्या माध्यमातू भाषा संशोधन व्हावे, या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे पुण्यातील मराठी अभ्यास परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तोजक संस्था, श्री शिवाजी रायगड स्मारक, भारत इतिहास संशोधक मंडळ या चार संस्थांना यंदाच्या वर्षीपासून पाच लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या माध्यमातून दुर्मिळ नियतकालिके, पुस्तके तसेच कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचा मानस या संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठी भाषेच्या विकासाकरिता या भाषेविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. काळानुरूप होणाऱ्या  बदलांचा आढावा घेतला की, त्याची भाषेच्या प्रगतीसाठी मदत होते. त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनेही याकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, यंदाच्या वर्षीपासून मराठी भाषाविषयक संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे.या अनुदानासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडे एकूण ५५ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १४ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. यामध्ये पुण्यातील चार संस्थांचा समावेश आहे. या अनुदानांतर्गत प्रत्येकी संस्थांना पाच लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल, अशी तरतूद आहे. या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मंजुरीची पत्रे पाठवण्यात येतील. त्याची प्रक्रिया सुरू असून, हे अनुदान २०१७-२०१८ या वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. भाषाविषयक काम करणा-या संस्थांचे योगदान, त्यांच्यातर्फे हाती घेण्यात येणारे प्रकल्प, या प्रकल्पांमधून मराठी भाषेच्या संशोधनाला चालना मिळू शकेल का, अशा विविध निकषांवर प्रस्तावांचा विचार करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२३ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेतर्फे दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मराठी भाषा, भाषाव्यवहार, व्याकरण आदींच्या अभ्यासासाठी मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून काम करत आहे. ‘भाषा आणि जीवन’ या नियतकालिकाच्या डिजिटायझेशनसाठी परिषद प्रयत्नशील आहे. शासनाकडून मिळणा-या अनुदानातून डिजिटायझेशनला सुरुवात करण्यात येणार आहे. या अंकांचा बांधीव खंड तयार करुन महाराष्ट्रातील प्राचीन ग्रंथालयांना भेट देण्यात येणार आहे. 
भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच शिवाजी रायगड स्मारक समितीतर्फे मोडी लिपीतील कागदपत्रांचे, पुस्तकांचे मराठीकरण करण्यात येणार आहे. शिवाजी रायगड स्मारक समितीकडून शासनाकडून मोडी लिपीतील सुमारे ३ लाख कागदपत्रे खरेदी करण्यात आली आहे. या कागदपत्रांचा देवनागरी लिपीत अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. 
...............
पाच लाखांचे अनुदान : पुण्यातील चार संस्थांचा समावेश
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे अनुदानासाठी भाषाविषयक काम करणा-या संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. संस्थेकडे आलेल्या ५५ प्रस्तावांची छाननी करुन १४ संस्थांना अनुदान मंजूर करण्यात आले. यामध्ये पुण्यातील चार संस्थांचा समावेश आहे. या संस्थांकडून जुनी पुस्तके, कागदपत्रे तसेच नियतकालिकांच्या डिजिटायझेशनवर भर देण्यात येणार आहे.
- आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था

Web Title: Digitization of rare literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.