‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

By admin | Published: September 7, 2015 04:14 AM2015-09-07T04:14:20+5:302015-09-07T04:14:20+5:30

पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस,

Disadvantage of shutting down PMPL | ‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

Next

आळंदी : पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चोविसावीवाडी, चऱ्होली, काटेवस्ती, देहू फाटा व आळंदी येथील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली बीआरटी सेवा पुणेकरांसाठी सोईची वाटत असली तरी पुणे शहराच्या विविध भागांतून आळंदीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या विद्यार्थी व वृद्धांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व वृद्धांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत असून या व इतर प्रवाशांसह आळंदीकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास नकोसा वाटत आहे.
बीआरटीची सेवा सुरू झाल्यापासून पुणे ते आळंदी मार्गावर ठिकठिकाणच्या टप्प्यावरील चढ-उताराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएलने चक्क वाऱ्यावर सोडून दिले असून आळंदी, चऱ्होली, चोविसावीवाडी, वडमुखवाडी, म्याग्झीन चौक, दिघी येथील दत्तनगर, परांडेनगर, गायकवाडनगर, विठ्ठल-रुक्मिणी चौक, जकात नाका या परिसरातील उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
आळंदी पंचक्रोशीतील सोळू, मरकळ, धानोरी, चऱ्होली, वडगाव, केळगाव व अन्य भागांतील प्रवासी आळंदी थांब्यावर येऊनच येथून पुढील प्रवास करतात. पुणे-आळंदी मार्गावरील या प्रवाशांना पुण्याहून येताना कोणत्याही गाडीत बसले तर विश्रांतवाडी येथे इच्छा नसली तरी उतरावे लागते, मग इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. या एकूण प्रवाशांपैकी कोणी विश्रांतवाडी चौकात उतरते, कोणी कळसला उतरते, कोणी दिघीला तर कोणी अन्य ठिकाणी. या एकूण प्रवासात लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, लहान मुली, मोठ्या मुली, कामगार महिला, नोकरदार महिला, मजूरवर्ग, पाठीवर, खांद्यावर ओझ्याचे बोचके घेऊन प्रवास करणारे
लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष यांच्यासाठी हा प्रवास खरोखर जीवघेणा ठरू पाहत आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, म. न. पा. व हडपसर येथून येताना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात पुन्हा मध्येच विश्रांतवाडी येथे उतरावे लागत असल्यामुळे व परतीच्या प्रवासात तर त्याहून वाईट अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आळंदीकडे येताना व जाताना प्रवासी त्रस्त आहेत.(वार्ताहर)

Web Title: Disadvantage of shutting down PMPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.