जिल्हा झाला चकाचक
By admin | Published: January 3, 2015 10:59 PM2015-01-03T22:59:16+5:302015-01-03T22:59:16+5:30
जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी हातात झाडू घेतल्याने ग्रामस्थांचाही सहभाग मिळाला.
पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी हातात झाडू घेतल्याने ग्रामस्थांचाही सहभाग मिळाला. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारीही या अभियानात रस्त्यावर उतरल्याने जिल्हा चकाचक झाला.
राजगुरुनगर, जुन्नर, मंचर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, सासवड, भोर, पौड, मुळशी, चाकण, आळंदी, देहू, रांजणगाव गणपती, तळेगाव ढमढेरे, मांडवगण फराटा, राहू, भिगवण, पळसदेव, कुरकुंभ या गावात महास्वच्छता अभियानानिमित्त विविध उपक्रमही राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. अंगणवाडीच्या ताई, सेविका, आरोग्य केंद्राचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
या उपक्रमांतर्गत शाळा परिसरासह गावातील रस्तेही स्वच्छ झाले. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही राबविण्यात आला. जमा झालेला कचऱ्याचा ढीग साठवून न ठेवता त्याचे खतात रूपांतर करण्यासाठी खड्ड्यात साठविण्यात आला. जिल्ह्यातील शाळांत विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. (वार्ताहर)