लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गजानन मारणे याच्या जंगी मिरवणुकीत सहभागी झाल्याचे प्रकरण मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.
आशिष भालचंद्र साबळे (वय ३२, रा. सिटी प्राईडजवळ, स्वारगेट) असे त्याचे नाव आहे.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी त्याची थेट तळोजापासून पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. या वेळी अनेक समर्थकांनी अलिशान गाड्यासंह या मिरवणुकीला हजेरी लावली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी साबळे यांनी मिरवणुकीला हजेरी लावली असल्याचे समोर आले. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या पथकाने साबळे यांना संगम ब्रिज येथील कार्यालयात आला असता अटक केली. अधिक तपासासाठी त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.