घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 08:00 PM2018-10-08T20:00:39+5:302018-10-08T20:01:16+5:30
वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे.
पुणे : वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून दोघे वेगवेगळे राहत होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा निर्वाळा घेत या प्रकराचा केवळ दोन महिन्यांत निकाल लावण्यात आला आहे.
कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश पलक जमादार यांनी हा दावा निकाली काढला. तुषार आणि हेमा (नावे बदलली आहेत) या दोघांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना एक ८ वर्षांची मुलगीही आहे. तुषार मर्चंट नेव्हीमध्ये सिंगापूर येथे चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. तर हेमा शहरातील नामांकित बिल्डरची मुलगी असून त्या वडिलांची कंपनी चालवत आहे. लग्नानंतर त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे एकमेकांशी सुर जुळत नव्हते. त्यामुळे ते २०१० पासून वेगळे राहत होते. त्यानंतरही दोघांचे पटेनासे झाल्यावर घटस्फोट मिळावा म्हणून त्यांनी अॅड. विक्रांत शिंदे यांच्यामार्फत ०८ आॅगस्ट रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता.
अॅड. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा न्यायालयाला दाखला सादर करून घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतरचा कमीतकमी लागणारा कालावधी कमी करून लवकर निर्णय द्यावा, असा युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात सहा महिन्याचा कालावधी वगळून त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. दरम्यान वाद झाल्यानंतर हेमा यांची तबीयत खालावली होती. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करून देखील न्यायालयाने हे प्रकरण लवकर निकाली लावले, असे शिंदे यांनी सांगितले. हिंदु विवाह कायद्याप्रमाणे पती पत्नी सहसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी पती पत्नी एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील तर ते घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात. हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात येतो.
............................
मुलीला फ्लॅट गिफ्ट
तुषार आणि हेमा यांना ८ वर्षाची मुलगी आहे. आई वडिल विभक्त झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यातील इतर खर्चाचा विचार करून तुषार यांनी पाषाण येथे असलेले १ हजार ४०० चौरस फुटाचा एक फ्लॅट तिच्या नावावर केला आहे.