दोन दिव्यांग विद्यार्थी अधिका-यांची ‘नेत्रदीपक’ यशोगाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:19 PM2018-07-04T22:19:14+5:302018-07-04T22:19:26+5:30
अविश्रांत प्रयत्न, अदम्य जिद्द याच्या जोरावर त्या ‘‘कोल इंडिया’’ या कंपनीतील पहिल्या दृष्टीदिव्यांग अधिकारी होण्याचा मान सोनम साखरे यांनी मिळवला आहे.
पुणे : मनात आणलं तर अशक्य असे काहीही नसते. याची प्रेरणात्मक प्रचिती सोनम साखरे यांच्या व्यक्तिमत्वातून येते. अविश्रांत प्रयत्न, अदम्य जिद्द याच्या जोरावर त्या ‘‘कोल इंडिया’’ या कंपनीतील पहिल्या दृष्टीदिव्यांग अधिकारी होण्याचा मान सोनम साखरे यांनी मिळवला आहे. गरीब शेतकरी कुटूंबातील सोनम यांनी मोठ्या चिकाटीने आपल्या यशोगाथेचा आदर्श तरुणांसमोर उभा केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाच्या वतीने काही वर्षांपासून सातत्याने रोजगारप्रधान शिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून दृष्टी-दिव्यांगांना (पूर्ण किंवा अंशत: दृष्टिदोष) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षण घेण्याची संधी विद्यापीठात मिळत असल्याची उदाहरणे आशादायी आहेत. हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी असणारे निशांत शहा आणि माजी विद्यार्थिनी सोनम साखरे सध्या शासकीय सेवांमध्ये भाषा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्या मूळच्या चंद्रपूर तालुक्यातील. या वर्षी ’’कोल इंडिया’’ कंपनीत भाषा अधिकारी पदावर नियुक्त झाल्या आहेत. आपल्या यशाबद्द्ल बोलताना त्या म्हणतात की, नोकरीसाठी मुलाखत सुरू झाली तिथून नियुक्ती झाल्याचा पहिला दिवस ते आजपर्यंत रोज सगळेजण आपलेपणाने समजून घेतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने व विद्यापीठात मिळालेल्या दर्जेदार शिक्षणाने मला इथे काम करताना कधीही अडचणी येत नाहीत. सर्व प्राध्यापक विशेषत: विभागप्रमुख प्रा. सदानंद भोसले सर नवीन संधी आणि ती संधी रोजगार म्हणून कशी मिळवता येईल यावर सतत मार्गदर्शन करत होते. त्यासाठी इतर आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी मदत केली म्हणून आज बिलासपूरला आपण राजभाषा अधिकारी या पदावर कार्यरत झालो आहोत. हया प्रवासात आजीने आणि आईने मला खूप मोठी मदत केली. माझी आजी तिच्या वेळची सातवी शिकलेली होती. ती काम करून दमलेली असली तरी मला शालेय जीवनापासून सगळे धडे मला वाचून दाखवायची. म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. घरात बाई शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते यावर माझा यामुळेच विश्वास बसतो. तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.