पुणे: पुणे शहर व परिसरातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी. या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर बाजारभावातील निम्यापेक्षा कमी किमतीत बुंदीचे लाडू व चिवडा विक्री उपक्रमाची सुरुवात बुधवारपासून (दि. २७) होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाडू चिवड्यासाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तरीसुध्दा या वर्षी लाडूचा भाव फक्त १४४ रुपये व चिवड्याचा भाव १४४ रुपये प्रति किलो ठेवला आहे, अशी माहिती दि पुना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुधा, अनिल लुंकड, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले उपस्थित होते. पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, की बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे बुधवार दुपारी ४ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता चेंबरचे सदस्य उत्तम दर्जाची हरभराडाळ घेऊन बेसन स्वतः तयार करतात व त्याचप्रमाणे साखर व वनस्पती तुपाची खरेदी करून चेंबरच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये चिवडा व लाडू देण्यात येतात.
शहरात चौदा ठिकाणी विक्री केंद्रे
पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यश लॉन्स येथे अहोरात्र लाडू व चिवडा बनविण्याचे काम सुरू राहणार आहे. बुधवारी सायंकाळपासून बुंदीचे लाडू व चिवड्याची विक्री दि पुना मर्चंटस् चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन, शंकरशेठ रोडवरील ओसवाल बंधू समाज कार्यालय, जयश्री ऑईल ॲण्ड शुगर डेपो (कोथरुड), आगरवाल सेल्स कॉर्पोरेशन (कर्वेनगर), नरेंद्र इलेक्ट्रीकल (एस.पी. कॉलेल समोर, टिळक रोड), भगत ट्रेडर्स (सिंहगड रोड), आझाद मित्र मंडळ (पुषमंगल कार्यालय, बिबवेवाडी), योगी रद्दी डेपो (अरण्येश्वर), कुवाड कोठारी सप्लाय कंपनी (कर्वेनगर), व्ही. एन. एंटरप्राईजेस (पद्मावती मंदिरासमोर) व अर्बन बाझार (सिंहगड रोड), श्री साई सामाजिक सेवा (कसबा पेठ), पवन ट्रेडर्स (चंदननगर), श्रीराम जनरल स्टोअर्स (चिंचवड) अशा चौदा ठिकाणी सुरू राहणार आहे.