"दो धागे प्रभू श्रीराम के लिए", अयोध्येतील राममूर्तीसाठी वस्त्र विणण्याची पुणेकरांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:32 AM2023-08-08T10:32:54+5:302023-08-08T10:33:05+5:30
हातमागावर नागरिकांना वस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार
पुणे : अयोध्येत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची संधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या व पुण्यातील हेरिटेज हॅण्डविव्हिंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पुण्यातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास व अध्यक्ष विनय पत्राळे यावेळी उपस्थित होते. गिरी म्हणाले, या उपक्रमांतर्गत प्रत्येक राज्यातून १-१ हातमाग इथे येईल. तसेच नेपाळसह इतरही काही देशांमधून हातमाग येणार आहेत. या हातमागावर नागरिकांना वस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. हा उपक्रम पुण्यात १० ते २२ डिसेंबर या १३ दिवसांत होणार आहे.
काही मान्यवरांच्या हस्ते पहिले काही धागे विणले जातील व यानंतर भाविक आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे या मागांवर विणू शकतील. वस्त्र विणण्यासोबतच येथे ‘श्रीरामासंबंधित’ व्याख्याने, भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच श्रीराम मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगणारे चित्रप्रदर्शन तसेच सकाळ-संध्याकाळ महाआरती व महाप्रसादाचे आयोजनदेखील या ठिकाणी असेल असे गिरी यांनी सांगितले.