पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माेठंं काम आहे. त्यांच्यावर टीका करणं याेग्य नाही असं मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. तसेच जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. पुण्यात कात्रज परिसरात हाेत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी करण्यासाठी ते गेले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते.
उदयनराजे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणे याेग्य नाही. त्यांनी शिवाजी महाराजांविषयी माेठे काम केले आहे. जेम्स लेनला शिक्षा ही झाली पाहिजे. सध्या देशाला छत्रपती शिवाजी माहाराजांच्या विचारांची गरज आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसृष्टीचं काम सुरु आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. तसेच राज्य सरकार बांधत असलेल्या स्मारकाचं काम कुठंपर्यंत आलंय ते माहित नाही, पण शिवस्मारक झालं पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान या आधी राष्ट्रवादी काॅंग्रेस काॅंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली हाेती. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये विलीन हाेणार नाही असे देखील ते यापूर्वी म्हणाले हाेते.