"निवडणुकीत छोट्या घटनेकडे दुर्लक्ष नको"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:22 AM2019-03-07T01:22:59+5:302019-03-07T01:23:01+5:30

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील घटक प्रमुखापासून ते काँस्टेबलपर्यंतच्या प्रत्येकाला त्याची काय जबाबदारी असेल, याची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित केले जात आहे़

"Do not ignore the small incident in elections" | "निवडणुकीत छोट्या घटनेकडे दुर्लक्ष नको"

"निवडणुकीत छोट्या घटनेकडे दुर्लक्ष नको"

Next

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील घटक प्रमुखापासून ते काँस्टेबलपर्यंतच्या प्रत्येकाला त्याची काय जबाबदारी असेल, याची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित केले जात आहे़ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी क्षुल्लक गोष्टीकडेदेखील दुर्लक्ष करता कामा नये. कायद्याच्या अधीन राहून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी तसेच गंभीर स्वरूपाचे प्रकरण असेल तर या प्रकरणाची शहानिशा करून गुन्हा दाखल करावा, अशा सूचना दिल्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी जयस्वाल यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी आयुक्तालय तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली. या प्रसंगी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार पोलिसांनी काम करायचे आहे़ निवडणूक काळात प्रत्येकाला काय जबाबदारी असेल, याची कल्पना अगोदरच देण्यात येत आहे़ त्यादृष्टीने मतदान केंद्र तेथील बंदोबस्त याबाबत पोलिसांना प्रशिक्षित केले जात आहे़ समाजविघातकाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे़ निवडणूक काळात शस्त्रांचा वापर होऊ नये, यासाठी बेकायदा शस्त्राच्या तस्करीवर लक्ष ठेवण्यात येत आहे़ पोलीस घेत असलेल्या सुरक्षेचा अहवाल दर आठवड्याला निवडणूक आयोगाला पाठविला जात असतो़ सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार असून पुणे विभागातील तयारीबाबत आपण संतुष्ट असल्याचे त्यांनी सांगितले़

>मूकबधिरांवर झालेल्या हल्ल्याचा अहवाल सादर करा
पुण्यात अपंग कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या मूकबधिरांवर झालेल्या लाठीमाराच्या प्रकरणाकडे पोलीस महासंचालक जयस्वाल यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत पुढे कारवाई होणार आहे, अशी विचारणा करण्यात आली.
त्यानंतर या प्रकरणात अहवाल सादर करण्याच्या सूचना पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम म्हणाले, लाठीमार प्रकरणाचा अहवाल लवकरच पोलीस महासंचालकांना सादर करण्यात येईल.
>एल्गार परिषदेचा शास्त्रोक्त तपास
एल्गार प्रकरणाच्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली. मी मुख्यमंत्री असतो तर पोलीस आयुक्तांना निलंबित केले असते, असे विधान पवार यांनी केले. पवार यांनी केलेल्या विधानाबाबत जयस्वाल यांच्याकडे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, एल्गार परिषद प्रकरणाचा तपास शास्त्रीय पद्धतीने झाला आहे. तांत्रिक तपासात आढळलेल्या पुराव्यांनुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी एल्गार प्रकरणाचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून केला आहे़ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी काम करायचे आहे. संवेदनशील मतदारसंघाची माहिती घेण्यात आली आहे. सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: "Do not ignore the small incident in elections"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.