लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ग्रामीण व शहरी भागातीलही खुल्या कुपनलिकांच्या मालकांवर आता सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या कुपनलिकांच्या खड्डयात पडून वारंवार अपघात होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अशा तीन सरकारी कार्यालयांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. शहरी भागात फार नसले तरी ग्रामीण भागात मात्र कूपनलिका घेण्याचे प्रमाण फार मोठे आहे. प्रामुख्याने शेतीसाठी कूपनलिका घेतात. त्यासाठी जमिनीत १०० ते १५० फूटांपेक्षाही खोल खड्डा घेतला जातो. पाणी न लागल्यास हा खड्डा तसाच सोडून दिला जातो. त्यात मुले पडून अपघात होतात.
त्याचीच दखल घेत पाणी पुरवठा विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पाणी नसलेल्या कुपनलिका त्वरीत बूजवून टाकाव्यात. ज्यांना पाणी लागले आहे, त्या बंदीस्त कराव्यात. जिथे खोदकाम सुरू आहे, त्या परिसरात लहान मुले येणार नाही याची काळजी घ्यावी अशा अनेक सूचनांचा यात समावेश आहे. ग्रामीण भागात या सुचनांविषयी जागरूकता आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे.
चौकट
कारवाई करू
“राज्य सरकारचे पत्र आम्ही राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये तसेच जिल्हा परिषदांना पाठवले आहे. आमच्या विभागाच्या जिल्हा कार्यालयांनाही याची माहिती दिली आहे. अपघातांचे कारण ठरु लागल्याने कूपनलिकांच्या मालकांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
-डॉ. मिलिंद देशपांडे, सहसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा