पुणे: दोघांच्या लग्नाला वीस वर्ष झाली. त्यांना १८ वर्षांची मुलगी आहे. तरीही पती पत्नीला मारहाण करायचा. तो सातत्याने मारहाण करत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली. पती पत्नीच्या माहेरी येऊन घराखाली आरडाओरडा करतो. त्याने खिडकीच्या काचा फोडल्या आहे. घराजवळील गाड्या पेटवून देईल, अशी धमकी त्याने पत्नीला दिली आहे. त्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला त्रास देऊ नये, तसेच तिच्या घरी व कामाच्या ठिकाणी जाऊ नये, असा आदेश न्यायालयाने पतीला दिला.
विशेष म्हणजे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला असून, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांनी देखील सूचित केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे पत्नीला मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल व सायली (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचे २००३ साली लग्न झाले आहे. राहुल हे लघू व्यावसायिक असून सायली नोकरी करतात. पती सातत्याने मारहाण करतो म्हणून त्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. राहुलने सायलीच्या माहेरी येऊन खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. त्यांनी एकदा पत्नीसह त्यांच्या आई - वडिलांना घराला कुलूप लावून कोंडून ठेवले होते. पोलिसांनी ते कुलूप तोडून त्यांना बाहेर काढले होते. त्यामुळे पतीच्या त्रासापासून बचाव व्हावा यासाठी संरक्षण आदेश (प्रोटेक्शन ऑर्डर) मिळण्याचा युक्तिवाद सायली यांच्या वकील ॲड. जान्हवी भोसले यांनी केला. या दाव्यात हजर राहण्याबाबत पतीला समन्स काढण्यात आला होता. न्यायालयाने पतीला पत्नीला फोन करायचा नाही, मुलीशी संपर्क साधायचा नाही, पत्नीचे कार्यालय व घरी जायचे नाही, पत्नीच्या कुटुंबीयांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास द्यायचा नाही या बाबी करण्यापासून रोखले आहे.