‘डराव डराव’चा आवाज कानी पडतोय का ? बेडूक गेले तरी कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:10 PM2022-07-04T14:10:42+5:302022-07-04T14:15:01+5:30
आता शहरात ‘डराव डराव’चा आवाजच कानी पडत नाही...
- श्रीकिशन काळे
पुणे : पश्चिम घाटात जैवविविधता खूप असून, बेडकांमध्येही दिसून येते. देशात सुमारे ४५० प्रजाती असून, त्यातील २५० या केवळ आपल्या पश्चिम घाटात आहेत. त्यातही महाराष्ट्रात ४३ आहेत. त्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक असून, त्यांचे अस्तित्व हे गोड्या पाण्याच्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे ज्या ठिकाणी गोडे पाणी तिथे बेडकांची संख्या मुबलक असते. शहरीकरणामुळे या बेडकांचे अधिवास नष्ट होत असल्याने आता शहरात ‘डराव डराव’चा आवाजच कानी पडत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
इला फाउंडेशनचे संस्थापक पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी पश्चिम घाटातील बेडकांच्या प्रजातींवर पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना विवेक विश्वासराव व एन. पी. ग्रामपुरोहित यांनी मदत केली. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे डॉ. के. पी. दिनेश यांनीदेखील त्यासाठी परिश्रम घेतले. या पुस्तकात पश्चिम घाटातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दीव दमण दादरा आणि नगर हवेली या परिसरातील बेडकांवर संशोधन केले आहे. कोणत्या परिसरात कोणत्या प्रजाती दिसतात आणि त्यांच्या छायाचित्रांसह माहिती पुस्तकात दिली आहे.
शहरीकरणाने पुण्यात सर्वत्र सिमेंटीकरण झाल्याने त्यांचा अधिवास नष्ट होतो आहे. आता पाणी साठत नसल्याने बेडकांना राहण्याची जागा नाही. पाण्यात डास होतात आणि विविध आजारांना निमंत्रण दिले जाते. बेडूक गोडे पाणी असेल, तरच तिथे राहतात.
पिवळा रंग का येतो?
पाऊस येण्यापूर्वी अनेक ठिकाणी पिवळे बेडूक दिसतात. त्यांना बुल आय फ्रॉग म्हणतात. पाऊस पडल्यानंतर प्रजनन करण्यासाठी नर बेडकाचा रंग पिवळा होतो आणि ते तोंडाखालील दोन फुगे मोठे करून मादीला बोलवत असतात. विशिष्ट प्रकारचा आवाज ते करतात. मादीसोबत मिलन झाल्यानंतर तो पिवळा रंग निघून जातो.
बेडूक हे किडे, कीटकांचे नियंत्रण ठेवते. तसेच सापांचे खाद्य म्हणून बेडकाला ओळखले जाते. अन्न साखळीत बेडूक आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी तो मित्र आहे; पण रासायनिक फवारणी, शहरीकरण, औद्योगिकीकरण, प्रदूषित पाणी, सांडपाणी यामुळे बेडकांचा अधिवास नष्ट झाला आहे. पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहणारा हा प्राणी आहे. शहरात आता दुर्मिळच आहे. गावात अजूनही दिसतो.
- डॉ. के. पी. दिनेश, संशोधक, राष्ट्रीय प्राणी सर्वेक्षण, पुणे
पश्चिम घाटातील बेडकांविषयीची माहिती समोर यावी म्हणून पुस्तक लिहिले. यात आपल्याकडे आढळणाऱ्या बेडकांच्या फोटोसह माहिती आहे. त्यांचे संवर्धन व्हावे, हाच हेतू पुस्तकाचा आहे. बेडूक हा देखील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी, संशोधक, सामान्य नागरिक यांच्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरेल.
- डॉ. सतीश पांडे, प्राणीतज्ज्ञ, इला फाउंडेशन संस्थापक