'माझ्याकडे रागाने बघतो काय', एकाच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीने वार; परिसरातही माजवली दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:56 PM2021-07-14T12:56:39+5:302021-07-14T12:56:59+5:30
जिवे मारण्याचा प्रयत्न करून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे.
लोणी काळभोर: “माझ्याकडे रागाने बघतो काय आता कसा जगतोय बघतोच, कोण - कोण मध्ये येत आहे पाहतोच, जो मध्ये येईल त्यांचे आज तुकडेच करतो” अशी धमकी देत विनाकारण एकाच्या मान, डोके व पोटावर कु-हाडीने वार केले. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे.
या मारहाणीत नितिन बापू गायकवाड ( वय ३४, रा. कदमवाकवस्ती, हवेली ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी उज्वला ( वय २७ ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आकाश दगडू आढाळे ( वय २८ ) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितिन गायकवाड हे प्लंबिगचे काम करतात. ते राहत असलेल्या सिध्दार्थ नगर येथे दोन तीन घरे सोडून पुढे अक्षय आढाळे राहतो. तो नेहमी गायकवाड यांच्याकडे येता - जाता रागाने बघून डिवचत असे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गायकवाड हे पत्नीसमवेत दुचाकीवरून भाजी आणण्यासाठी निघाले.
त्यावेळी त्यांच्या घराजवळील चौकात अक्षय अढाळे हा उभा होता. त्याने गायकवाड यांच्याकडे रागाने पाहिल्याने गाडी थांबवून त्यास जाब विचारला असता त्याने थांब बघतोच तुझ्याकडे असे म्हणून शिवीगाळ केली. वाद नको म्हणुन पती - पत्नी तेथून निघून गेले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते परत आले तेव्हा चौकामध्ये आढाळे उभा होता. गायकवाड हे त्यांच्या बहिणीकडे गेले. त्यांच्या घरी ७ - ३० वाजण्याच्या सुमारांस पतीचा मोठयामोठयाने आवाज येत आल्याने उज्वला व सासु प्रभा घराबाहेर आल्या तेव्हा आढाळे हा कुऱ्हाडीने गायकवाड यांच्या डोक्यात मारत होता.
तेव्हा उज्वला पळत गेल्या असता त्यांच्याही अंगावर कु-हाड उगारुन त्यांच्या पतीच्या मानेवर कु-हाडीने जोरात मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यावेळी अक्षय यांने त्यांचे हातातील कुऱ्हाड हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण करुन “माझ्याकडे रागाने बघतो काय आता कसा जगतोय बघतोच, कोण - कोण मध्ये येत आहे पाहतोच, जो मध्ये येईल त्यांचे आज तुकडेच करतो” असे म्हणुन मोठयामोठयाने ओरडु लागला. तेव्हा तेथे असणारे इतर लोक सैरावैरा पळुन गेले. तेथील परिसरातील लोकांनी त्यांचे घराचे दरवाजे खिडक्या बंद करुन घेतल्या. त्यानंतर गायकवाड यांना कदमवाकवस्ती येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.