डॉक्टरवर निलंबनाची कारवाई, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा झाला होता मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:45 AM2018-03-27T02:45:53+5:302018-03-27T02:45:53+5:30
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्या बाळासह जीव गमवावा लागला.
पुणे : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्या बाळासह जीव गमवावा लागला. संबंधित डॉक्टरला तत्काळ निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या सभेत सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. सत्ताधारी सदस्यांसह सभागृहातील सर्वच सदस्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संबंधित डॉक्टरला निलंबित केल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जाहीर केले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
स्मार्ट, मेट्रो सिटी असलेल्या पुणे शहरात गेल्या तीन वर्षांपासून आरोग्यप्रमुखाचे पद रिक्त आहे. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नाहीत, प्रचंड अस्वच्छता, वेळेवर औषध उपलब्ध होत नाहीत, यांसारख्या बाबींकडे महापालिका प्रशासन वारंवार दुर्दैवी घटना घडूनदेखील दुर्लक्ष करत आहे. महापालिका रुग्णालयातील गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच राजीव गांधी रुग्णालायतील डॉक्टरला तत्काळ निलंबित करण्यासाठी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सत्ताधारी सदस्यांसह संपूर्ण सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेवर न आल्याने प्रसूतीसाठी आलेल्या आई व बाळाचा मृत्यू झाला होता. यासंबंधित डॉक्टरला त्वरित निलंबित करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रकरणात डॉ. विजय बडे यांना निलंबित करण्यात आले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.