पुणे : अल्काेहाेलच्या सेवनामुळे लिव्हर सिराेसिस (यकृताचा दुर्धर आजार) तसेच यकृत, स्वरयंत्र, अन्ननलिका यांचा कॅन्सर हाेताे तसेच मेंदुतील रक्तस्त्रावही हाेउ शकताे. आपण आराेग्य व्यावसायिक आहाेत. त्यामुळे आपण निराेगी जीवनशैलीचा अवलंब करायला हवा. तसेच, या मदयाचा वापर हा डॉक्टरांच्या शैक्षणिक कॉन्फरन्स (सीएमई), वर्कशाॅप, सेमिनार मध्ये टाळू शकता, असे परिपत्रक केंद्रीय आराेग्य विभागाने देशातील सर्वच वैदयकीय व्यावसायिकांच्या संघटनांना जारी केले आहे.
डॉक्टरांच्या शैक्षणिक कॉन्फरन्स मध्ये मद्यवाटप होवू नये, दारूच्या सेवनातून विविध आजार होतात, त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या वर्तनातून मद्यपानाचा प्रचार होणार नाही, असा आदर्श घालून द्यावा या हेतूने हे परिपत्रक जारी केले आहे. डॉक्टरांच्या शैक्षणिक कॉन्फरन्स हाेतात. खासकरून त्या - त्या स्पेशालिटीच्या डाॅक्टरांच्या शैक्षणिक कॉन्फरन्स हाेतात. त्या अनेकदा फार्मास्युटिकल कंपन्याही आयोजित करत असतात. तसंच विविध शहरांतील स्थानिक आय.एम.ए. (इंडियन मेडिकल असोसिएशन) चे मेळावेही होत असतात.
या परिपत्रकात म्हटले आहे की, देशात असंसर्गजन्य आजारांमुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण एकुण मृत्यूच्या तुलनेत ६३ टक्के आहे. तंबाखूचा वापर, शारीरिक निष्क्रियता, अल्काेहाेलचा धाेकादायक उपयाेग आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी हे या असंसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरणारे घटक (रिस्क फॅक्टर) आहेत. त्यापैकी अल्काेहाेल सेवनामुळे अनेक आजार हाेतात. आपण वैदयकीय व्यावसायिक असल्याने आपण निराेगी जीवनशैलीचे पालन करायला हवे. त्यासाठी काेणत्याही स्वरूपातील अल्काेहाेलचे सेवन हे मेडिकल काॅन्फरन्स, वर्कशाॅप, सेमिनारमध्ये टाळायला हवे. केंद्रीय आराेग्य खात्याचे महासंचालक प्राे. अतुल गाेयल यांनी हे निर्देश जारी केले आहेत.
ऑर्थाेपेडिक असाेसिएशनवर झाले हाेते आराेप
साेलापुर येथील आर्थाेपेडिक सर्जन डाॅ. संदीप आडके यांनी महाराष्ट्र आर्थाेपेडिक असाेसिएशन या अस्थिराेगतज्ज्ञांच्या संघटनेवर याबाबत आराेप केले आहेत. वैदयकीय मेळाव्यात मदयपान हाेत असल्याचे त्यामध्ये म्हटले हाेते. हे केवळ याच असाेसिएशनबाबद नव्हे तर सर्वच प्रकारच्या स्पेशालिटी असलेल्या डाॅक्टरांच्या असाेसिएशनमध्ये मदयपान हाेत असल्याचेही याआधी आढळून आलेले आहे.