पुणे : ससून रुग्णालयात माेफत किंवा अत्यल्प दरांमध्ये सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया हाेतात. याला हृदयशल्यचिकित्सा (कार्डिओव्हॅस्क्यूलर थाेरायसिक सर्जरी) विभाग अपवाद आहे. कारण, रुग्णाचे बायपास किंवा इतर शस्त्रक्रिया करण्यासाठी काही रुग्णांकडून ५० हजार ते दाेन लाख रुपयांपर्यंतची मागणी हाेते. ३० ते ३५ हजारांवर ताेडपाणी हाेते, असे ‘लाेकमत’च्या स्टिंगमधून समाेर आले आहे. डाॅक्टरांनी रुग्णाकडून फाेनवरच पैसे मागितल्याची संभाषणाची रेकाॅर्डिंगदेखील आहे.
पैसेच नसल्याने घेतले ‘डिस्चार्ज’
शहरातील मध्यवस्तीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला. नातेवाईकांनी त्यांना दि. २२ सप्टेंबरला ससून रुग्णालयाच्या हृदयशल्यचिकित्सा विभागात ॲडमिट केले. संबंधित तपासण्या केल्यानंतर तेथील डाॅक्टरांनी त्यांना हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सूचविले. नियाेजित शस्त्रक्रियेच्या आधीच्या दिवशी त्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली गेली. ही बाेली ३५ हजार रुपयांपर्यंत खाली आली. मात्र, नातेवाईकांकडे पैसे नसल्याने त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.
‘जन आराेग्य’त नाेंद करूनही मागणी
ससून रुग्णालयात महात्मा फुले जन आराेग्य याेजना असल्याने जवळपास ८० ते ९० टक्के शस्त्रक्रिया या याेजनेतून माेफत हाेतात. रुग्ण याेजनेत पात्र नसला तरीही काेणतीही माेठी शस्त्रक्रिया पाच ते दहा हजारांच्या आतच हाेते. विशेष म्हणजे, पीडित रुग्णाचे नाव जन आराेग्य याेजनेत नाेंदवलेले हाेते. तरीदेखील त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. तसेच हे पैसे हृदयासाठी लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणासाठी तसेच भुलीच्या डाॅक्टरांसाठी लागतील, असे सांगितले. वस्तूत: बायपाससाठी काेणतेही वैद्यकीय उपकरण लागत नाही. तसेच भुलीचे डाॅक्टरही उपलब्ध असतात.
ससून रुग्णालयातील हृदयशल्यचिकित्सा विभागातील डाॅक्टरांकडून मला भुलीच्या डाॅक्टरांना बाहेरून बाेलवावे लागते, तसेच बायपास करताना कंपनीचे वैद्यकीय उपकरण घ्यावे लागतात, असे सांगून मला ५० हजार मागितले हाेते. शेवटी ३५ हजारांवर आले; परंतु, तेही माझ्याकडे नसल्याने मी आईचा डिस्चार्ज केला.
- पीडित रुग्णाचा मुलगा
हृदय शल्यचिकित्सा विभागातील एक डाॅक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात फाेनवर झालेले संभाषण...
नातेवाईक : डाॅक्टर हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांबाबत मी मित्रांकडे मागणी केली आहे. उद्या, परवा ते जमा हाेतील.
डाॅक्टर : ठीक आहे, मग ऑपरेशन शनिवारी करत नाही. साेमवारी करू.
नातेवाईक : ताेपर्यंत रुग्णाला काही त्रास हाेणार नाही ना?
डाॅक्टर : तसे सांगता येणार नाही. औषधे चालू आहेत; पण शेवटी कसे आहे ते हृदय आहे. त्याचे काही सांगता येत नाही.
नातेवाईक : तुम्ही ५० हजार रुपये सांगितले, पण त्यामध्ये काही कमी हाेणार नाहीत का?
डाॅक्टर : ठीक आहे. याबाबत कंपनीसाेबत व सरांनाही (वरिष्ठ डाॅक्टर) बाेलताे.
नातेवाईक : परंतु, आपल्या डाॅक्टरांनी उद्या शस्त्रक्रिया करण्यासाठीची तयारी केली आहे.
डाॅक्टर : ठीक आहे; पण ऑपरेशन हाेल्डिंगवर ठेवू.
नातेवाईक : आधी पैशांचे बाेलले असते तर तयारी केली असती.
डाॅक्टर : आम्ही पेशंट पाहून सांगताे ना.
नातेवाईक : बघा सर, आई आहे माझी, काहीतरी करा.
डाॅक्टर : तुम्ही साेमवारी ९ वाजता भेटा. सर व कंपनीवाले येतील, त्यांच्यासाेबत बाेलू. एक तर आता पैसे द्या किंवा घरी जाऊन परत या, असे दाेन पर्याय तुमच्यापुढे आहेत.
नातेवाईक : मी १५ दिवस कामाला गेलाे नाही, त्यामुळे पैशांची अडचण आहे.
डाॅक्टर : उद्या, किती हाेतील ॲडजस्ट?
नातेवाईक : बाेललाे आहे मित्रांना, पाहताे.
डाॅक्टर : मग उद्या ठेवायचे का नाही ऑपरेशन?
नातेवाईक : कंपनीवाल्यांना पैशांसाठी थांबवता येणार नाही का?
डाॅक्टर : पैशांची अरेंजमेंट करा मग, उद्या करता येत नाही ऑपरेशन नंतर करू.