पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार असे अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत त्यावर कोणी बोलतय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, राज्यातील नागरिक अनेक अडचणीत सापडले आहेत, ते मदत मागण्यासाठी सरकार कडे जात नाहीत. त्यांच्यासमोर मुलांचं शिक्षण, नोकरी याबरोबरच एसटी कामगारांचा मूळ प्रश्न आहे. त्याकडेही बघितले जात नाही. आमचे मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना मदत करत आहेत. त्यांच्या समस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.