जुन्नर येथे पाळीव कुत्र्यांनी मोडली बिबट्याची दहशत , बिबट्या गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 08:32 PM2018-05-30T20:32:08+5:302018-05-30T20:32:08+5:30
धनगर वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर दोन कुत्र्यांनी प्रतिआक्रमण करत जोरदार हल्ला चढविला. त्यात बिबट्याला गंभीर जखमी करत आपल्या मालकाचे नुकसान तर टाळलेच त्यासोबत बिबट्याची दहशत देखील मोडीत काढली.
विजय चाळक
जुन्नर : बिबट्याकडून मानवी वस्त्यांवर सातत्याने हल्ले होत असतात. यातून त्याची मोठी दहशत माणसे तसेच पाळीव प्राण्यांमध्ये निर्माण झालेली आहे. परंतु, चक्क दोन कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला करुन एकप्रकारे त्याची वाढत चाललेली दहशतच मोडून काढली आहे. या दुर्मिळ घटनेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी ( दि.२९मे) चाळकवाडी ( ता जुन्नर) येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बिबट्यानेही कुत्र्याला चावा घेऊन जखमी केले आहे
जुन्नर तालुका हा बिबट्या प्रणवक्षेत्र असून तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होतच असतात. चाळकवाडी येथील शेतकरी अनिल बबन सोनवणे यांच्या घराजवळ असलेल्या उपळीच्या ओढ्याशेजारील शेतात एक धनगराचा वाडा मुक्कामासाठी होता. या वाड्यावरील मेंढ्याच्या कळपावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याची चाहूल वाड्यावर असलेल्या दोन कुत्र्यांना लागल्यानंतर नी बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांची आक्रमकता पाहून बिबट्याने तेथील एका निरगुडीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्यानंतर हा बिबट्या खाली उतरल्यानंतर या दोन्हीही कुत्र्यांनी पुन्हा त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यानंतर कुत्र्यांच्या तावडीमधुन कशीबशी सुटका करत बाभळीच्या झाडाच्या आश्रयाला गेला. थोड्या अवधीने पुन्हा बिबट्याने या कुत्र्यावर झेप टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या दोन्हीही कुत्र्यांच्या गळ्यात दातेरी पट्टा असल्यामुळे बिबट्याचा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. सुमारे अर्धा ते पाऊणतास बिबट्या व कुत्र्यांची ही झुंज सुरु होती. या झुंजीत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. तर बिबट्याने एका कुत्र्याला चावा घेतल्यामुळे कुत्र्याच्या कानाला व उजव्या पायाला जखम झाली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले सर्पमित्र आकाश माळी व वनरक्षक सी एस कांबळे वनरक्षक विभुते ए.जी मोमीन एस.ए.राठोड व्ही ए.अढागळे व त्यांचे सर्व सहकारी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याची कुत्र्याच्या तावडीमधुन सुटका केली. जखमी झालेला बिबट्या एक वर्ष वयाचा असून तो नर जातीचा असल्याची माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली. जखमी झालेल्या बिबट्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल केले असून तेथील वैद्यकीय अधिकारी डाँ अजय देशमुख हे त्या बिबट्यावर उपचार करत आहेत.