कोरोनामुक्त झाल्यावर या पठ्ठ्याचे नऊवेळा ‘हे’ दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:21 AM2021-02-21T04:21:29+5:302021-02-21T04:21:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना झाला तर काय आणि यामुळेच ‘पॅाझिटिव्ह’ या शब्दाबरोबर येणाऱ्या भीतीला अपवाद ठरला आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना झाला तर काय आणि यामुळेच ‘पॅाझिटिव्ह’ या शब्दाबरोबर येणाऱ्या भीतीला अपवाद ठरला आहे एक पुणेकर. तो स्वत: कोरोनातून बरा झालाच. पण या नंतर त्याच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडिजचा उपयोग इतर कोरोनाग्रस्तांना व्हावा यासाठी त्याने तब्बल नऊ वेळा प्लाझ्मादान केले आहे.
पुण्याचा रहिवासी ५० वर्षीय अजय मुनोत हे या दानशुराचे नाव आहे. ते आणि त्यांची पत्नी २८ जुलैला कोरोना ‘पॅाझिटिव्ह’ आढळले. त्रास होत असल्याने मुनोत यांना बालेवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. श्वसनाचा काही काळ झालेला त्रास वगळता इतर काही त्रास त्यांना झाला नाही. मात्र कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता त्यांनी त्याच वेळी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला.
मुनोत यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “मी बरा झाल्यानंतर ‘ॲंटीबॉडिज’ आहेत का याची चाचणी केली. त्यानंतर पहिल्यांदा प्लाझ्मादान केले. यानंतर मला लक्षात आले की १४ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा प्लाझ्मादान करता येते. मग मी सातत्याने दान करायला सुरुवात केली. १७ तारखेला माझा ५०वा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मला १७ तारखेलाच दान करायचे होते. मात्र १४ दिवस न झाल्याने त्या दिवशी प्लाझ्मा देता आला नाही. पण आज मात्र मी दान केले.”
मुनोतांचे हे नववे प्लाझ्मा डोनेशन होते. असे दान करता येते का याबाबत विचारले असता डॉ. संजय पाटील म्हणाले, “प्लाझ्मादानासाठी ॲंटीबाॅडिजची तपासणी केली जाते. त्याचे प्रमाण योग्य असेल तर कितीही वेळा प्लाझ्मादान करता येते. जीव वाचवण्यासाठी प्लाझ्माचा उपयोग होतो. त्यासाठी अनेकांनी प्लाझ्मादान करणे महत्त्वाचे आहे.”