ससूनच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याने देणग्याही परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:36 PM2018-04-03T19:36:18+5:302018-04-03T19:36:18+5:30
रुग्णालयाकडे रुग्णांचा वाढता ओढा आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून २००९ मध्ये रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीचे काम हाती घेण्यात आले.
पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याने देणगीदारांकडून मिळणाऱ्या देणग्याही आता परत जाऊ लागल्या आहेत. नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्था व खासगी कंपन्या पुढे सरसावल्या होत्या. पण मागील दोन वर्षांपासून इमारतीचे काम जवळपास बंद पडल्याने देणगीदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या देणग्यांवर रुग्णालय प्रशासनाला पाणी सोडावे लागत आहे.
रुग्णालयाकडे रुग्णांचा वाढता ओढा आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून २००९ मध्ये रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीचे काम हाती घेण्यात आले. ही नवीन इमारत सर्व सोयी-सुविधा, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्याचे नियोजन आहे. सध्या इमारतीचे अकरा मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप फर्निचर, विद्युतीकरण यांसह बरीच छोटी काम रखडली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने ही काम रखडल्याची चर्चा आहे. इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर काही सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांनी सामाजिक दायित्वाअंतर्गत (सीएसआर) वैद्यकीय उपकरणांसाठी देणगी देण्याची उत्सुकता दाखविली होती. काही कोटी रुपयांच्या देणगीतून नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे मिळणार होती. मात्र, काम रखडल्यामुळे काही संस्थांनी देणगी परत घेतली आहे. तर काही देणगीदारांनीही नाराजी व्यक्त केली असून आता देणग्या देण्यास आखडता पाय घेतला आहे.
मागील तीन-चार वर्षांमध्ये ससून रुग्णालयाला सुमारे ८५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामधून सध्याच्या इमारतीमध्ये विविध वैद्यकीय उपकरणांसह अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा कायापालट होऊ लागला आहे. अशाच पध्दतीने नवीन इमारतीमध्येही देणग्यांच्या माध्यमातून सुविधा निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, काम रखडल्याने कोट्यावधी रुपयांच्या देणग्यांपासून ससून रुग्णालयनवीन इमारतीला २००९ मध्ये सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ६७ कोटी रुपये खर्च झाला. त्यातीलही कंत्राटदाराचे पाच कोटी रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित आहे. तिसऱ्या टप्यामध्ये फर्निचर, विद्युतीकरण व इतर कामांसाठी शासनाकडून १०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार ६५ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याद्वारे एका कंत्राटदाराची निवड करून निविदा स्वीकृतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र, दोन महिन्यांपासून त्यावर निर्णय झालेला नाही. २०१६-१७ मध्ये ५८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपये बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला देण्यात आले. तर ३८ कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवली आहे. यातील एक रुपयाही ससूनमधील कामासाठी खर्च झालेला नाही. २०१७-१८ साठी मंजूर करण्यात आलेले १६ कोटी रुपयांचा निधीही परत जाण्याची शक्यता आहे.
वंचित राहावे लागत आहे.
----------------
नवीन इमारतीमध्ये विविध वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांकडून देणग्या देण्यात आल्या आहेत. मात्र काम पुर्ण न झाल्याने एका संस्थेने दिलेली सुमारे अडीच कोटी रुपयांची देणगी परत गेली आहे. तर इतर संस्था व कंपन्यांकडून मिळणाऱ्या देणग्याही परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काम लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता