कल्याणीनगर येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:40 PM2019-12-16T19:40:37+5:302019-12-16T19:41:08+5:30
दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट
विमाननगर : कल्याणीनगर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी फोडून लुटणाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपी फरारच आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कल्याणीनगर मित्र मंडळ व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कल्याणीनगर येथील गणपती मंदिराच्या आवारातील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली.या प्रकरणी मंदिर समितीचे सदस्य राहूल निगडे यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार लक्षात आला. तात्काळ येरवडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी मंदिराची खिडकीची काच फोडून चोरट्यांनी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास गाभार्यात प्रवेश केला. सर्वप्रथम आतील बाजूस असणार्या सीसीटिव्हीच्या वायरी तोडल्या.त्यानतंर दानपेटीची बिजागरी उचकून आतील दानरूपी जमा असलेली अंदाजे पस्तीस हजार रुपये रोख रक्कम दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली. चोरी करून अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी बाहेर पडताना बाहेरील सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
कल्याणीनगर सारख्या ठिकाणी मंदिराच्या आवारातून दानपेटी फोडून चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या वतीने देखील दाखल गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
कल्याणीनगर गणपती मंदिराचे अध्यक्ष रमेश कांबळे म्हणाले,कल्याणीनगर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना गंभीर आहे.मंदिराच्या संपूर्ण परिसर सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले आहेत.हा गंभीर गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केलेला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी यावेळी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे करीत आहेत.