पुणे : पुणे महापालिका प्रशासनाने कशाचाही अभ्यास न करता नियोजनशून्यरीतीने ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प पुणेकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका पालिकेतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने घेतली आहे़. तसेच प्रकल्पाची पुनर्रचना करावी, अशी मागणी होत आहे. ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पावर सध्या पालिका वर्तुळात मोठी चर्चा आहे़. नागरिक कृती समितीने यास विरोध करून पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य अंमलबजावणीविरोधात आवाज उठविला आहे़. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी पक्षासह इतर पक्षांची मते जाणून घेतली असता, सद्य:स्थितीला नियोजित केलेल्या ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पावर सर्वांनीच पुनर्रचनेची अपेक्षा व्यक्त केली आहे़. शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी आणला गेला असल्याचे सांगितले़. १९८७ साली आलेला हा प्रकल्प पुढील चार-पाच वर्षांत अमलात आला असता तर तो आहे. योग्य होता; पण आजची परिस्थिती वेगळी आहे़. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतु तो चुकीच्या पद्धतीने पुणेकरांवर लादणेही योग्य नाही़. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीवर कडक कारवाई करावी, अशीही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले़. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी, या प्रकल्पाची पुनर्रचना करून तो सर्वसंमतीने अमलात यावा, असे मत व्यक्त केले़. ४० वर्षांपूर्वी केलेला प्रकल्पाची आज शहराच्या दृष्टीने उपयुक्ततता तपासली गेली पाहिजे़. या प्रकल्पाची रचना, आलेल्या वाढीव दराच्या निविदा हे सर्वच संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले़. ......
* टेंडर प्रक्रियेतून पैसे काढण्यासाठीच ‘एचसीएमटीआर’ची घाई : अरविंद शिंदे ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी केलेली घाई, हे पूर्वनियोजित होते़. कोण निविदा भरणार हेही अगोदरच ठरले होते़. अदानी ग्रुपला हे काम मिळावे व त्यांचे बँकेतील हजारो कोटींचे कर्ज मंजूर होऊन त्यातून पैसे कमविणे, हाच यातील मुख्य हेतू होता़, असा थेट आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला़. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी, अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे केल्याने याच्या फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़. पुणे महापालिकेच्या करदात्याचा पैसा अशा कुठल्याही वायफळ प्रकल्पाच्या मार्गाने वाया जाणार याची काँग्रेस पक्ष दक्षता घेत असल्याचेही ते म्हणाले़. .................
प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक : महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक आहे. सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विश्वासात घेऊनच तो प्रत्यक्षात आणला जाईल व त्यानुसार प्रशासनाशी चर्चा करून त्याची आखणी करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले़.