जवाब दो आंदोलन यापुढे चालूच ठेवणार - मुक्ता दाभोलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 11:25 AM2018-08-20T11:25:47+5:302018-08-20T11:30:39+5:30
जवाब दो आंदोलन यापुढे चालूच ठेवले जाणार असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्या व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या एका खुन्याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र तेवढे पुरेसे नाही. कटाचा उलगडा होऊन सुत्रधारांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निर्भयपणे विचार मांडण्याचा अवकाश उपलब्ध झाला पाहिजे. त्यामुळे जवाब दो आंदोलन यापुढे चालूच ठेवले जाणार असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्या व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून सकाळी आठ वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात हा मोर्चा पोहचून त्याचे सभेत रूपांतर झाले. दुर्जन माणसांचा नाश करा असे जाहीरपणे बोलणाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार आहे असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी केला. संघर्षाशिवाय आपल्या समाजात आता रचनात्मक काम करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ दिगदर्शक अमोल पालेकर, हमीद दाभोलकर, मेघा पानसरे, मिलिंद देशमुख उपस्थित आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांद्वारे विचारांचा जागर मांडला जाणार आहे.