डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:24+5:302021-02-06T04:18:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेले असता त्या काळात रमामाईंनी अतिशय कष्टाने, धैर्याने घर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेले असता त्या काळात रमामाईंनी अतिशय कष्टाने, धैर्याने घर, कुटुंब सांभाळले. बाबासाहेबांचे शिक्षण अपूर्ण राहू नये, शिक्षणापासून ते विचलित होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमामाई आंबेडकर या महामातांनी महापुरुष घडविले,” असे प्रतिपादन रमामाई भीमराव आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले. रमामाई यांच्यावरील साहित्य इंग्रजी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीचे औचित्य साधून रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे आयोजित रमाई महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (दि.३) बोधीवृक्षाला जल अर्पण करून झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे अध्यक्षस्थानी होते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, नगरसेवक अविनाश बागवे, कुणाल राजगुरू यावेळी उपस्थित होते. प्रमोद आडकर महोत्सवाचे अध्यक्ष असून नगरसेविका लता राजगुरू स्वागताध्यक्ष तर विठ्ठल गायकवाड मुख्य समन्वयक आहेत.
गुजरात दौऱ्यावर असताना तेथील लोकांनी रमामाईंचे साहित्य गुजरातीत नसल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकांनी अभ्यास करून डॉक्टरेट मिळविली. रमामाईंबद्दलचे साहित्य अन्य भाषांमध्ये नसल्याने अभ्यासकांसमोर अडचणी येतात. त्यामुळे रमामाईंचे साहित्य विविध भाषांत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. डॉ. देखणे म्हणाले, की पूर्व आणि पश्चिम पुण्याचा अनुबंध साधणारा हा महोत्सव आहे. बाबासाहेब आणि रमामाई हे अद्वैत आहे. बाबासाहेब क्रांतिसूर्य आहेत तर रमामाई या प्रभा आहेत.