मंचर : मावशीकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्यानंतर मावस भावासोबत स्वतःच्या घरी वाढदिवस करण्यासाठी निघालेल्या दोघांचा पुणे नाशिक महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव वेगातील एस.टी.गाडीने समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित गोपीनाथ रासकर (वय 19 रा. तळेगाव ढमढेरे कासारी ता. शिरूर) व प्रज्वल गणेश भास्कर (वय 13 रा. जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल बाबत एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मंचरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ रामदास रासकर रा. तळेगाव ढमढेरे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा पुतण्या रोहित रासकर हा मोटरसायकल घेऊन जुन्नर येथे मावशीला भेटण्यासाठी गुरुवारी गेला होता. आज सकाळी तो मावसभाऊ प्रज्वल गणेश भास्कर याच्यासोबत जुन्नर वरून घरी निघाला होता. त्यांची दुचाकी पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाववरून मंचरकडे येताना समोरून आलेल्या एसटीने दुचाकीला जोरदर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
मावशीकडे वाढदिवस साजरा करून निघाला होता स्वतःच्या घरी
अपघातात ठार झालेल्या रोहित गोपीनाथ रासकर याचा आज वाढदिवस होता. रात्री मावशीकडे जुन्नर येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. आज रोहित याचा वाढदिवस घरी तळेगाव ढमढेरे येथे साजरा केला जाणार होता. वाढदिवसासाठी तो प्रज्वल ला घेऊन घरी निघाला असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या घरी शोकाकुल वातावरण झाले. मंचर पोलिस ठाण्यासमोर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहवत नव्हता.