मोरगाव : श्रावण महिना म्हटले की, सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. मात्र, बारामती तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रावणाचा मागमूसही लागत नाही. जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, टँकर मागणी यामुळे तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य स्थिती आहे.तालुक्याच्या जिरायती भागातील १६ गावांमध्ये दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेच्ो पाणी शेवाळ व गढूळयुक्त येत आहे. यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. जिरायती भागातील मोरगाव, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी या गावांमध्ये दुष्काळीस्थिती आहे. मोरगाव येथील गावठाणासह गव्हाळवस्ती, सोनार शेत येथे टँकरची मागणी असल्याचे ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी सांगितले. जोगवडी येथील खोमणेवस्ती, भोसलेवस्ती, मुकादमवस्ती येथे एक टँकरची मागणी ग्रामसेवक सोमनाथ थोरात यांनी केली आहे. तसेच, तरडोली येथे मे महिन्यापासून टँकर सुरू आहे. मात्र, हे पाणी अपुरे पडत असल्याने वाढीव टँकरची मागणी असल्याचे ग्रामविकास अधिकारी साळुंखे यांनी सांगितले. तसेच, मुर्टी येथे भीषण पााणीटंचाई असल्याचे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलवडे यांनी सांगितले आहे. पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दुष्काळजन्य परिस्थिती
By admin | Published: August 27, 2015 4:43 AM