पुणे : सायंकाळी सहाची वेळ. स्वारगेट बसस्थानकाचा परिसर. एक आजोबा बसमध्ये चढताना पडतात आणि त्यांच्या डोक्याला जखम होते. यावेळी तेथील एक अली अजगर हे त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांची मदत पुरेशी नव्हती. यावेळी दिवसभराचे कर्तव्य पार पाडून दोन महिला पोलीस कर्मचारी घरी निघालेल्या होत्या. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येतो. तत्काळ त्या दोघीही आजोबांच्या मदतीला धावून जातात. आजोबांना काहीच सांगता येत नव्हते.रिक्षावाल्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असताना देखील ते थांबत नव्हते. एका वाहतूक पोलिसाच्या मदतीने त्यांनी कसेबसे एका रिक्षावाल्याला थांबविले व आजोबांना त्यामधून दवाखान्यात घेऊन गेले. दोन्ही कर्मचाऱ्यांनी आजोबांना ससूनला न नेता प्रसंगावधान राखत त्यांना त्यांच्या नेहमीच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करून घरच्यांच्या ताब्यात दिले. पर्किन्सन्सचा आजार असलेल्या आजोबांना घरातील मंडळी खूप जपतात. मात्र त्या दिवशी ते कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी ही केलेल्या मदतीविषयी कोणाला सांगितले नव्हते.या आजोबांवर गेली २० वर्षे उपचार करणारे डॉ. नितीन बोरा यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना ई मेल करून त्या दोन महिला पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीची बाब उघड केली. राजनंदिनी साळवे व भाग्यश्री वाघमारे अशी या दोन महिला पोलीस कर्मचा-यांचे नावे आहेत. त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे होते. याबाबत राजनंदिनी साळवे यांनी सांगितले की, २५ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. आम्ही दोघी पोलीस आयुक्त कार्यालयात स्क्रीप योजनेचे काम पाहतो.बसने घरी जात असताना स्वारगेटला गर्दी दिसल्याने पाहिले तर, एक आजोबा रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. त्यांची काळजी घेणे गरजेचे होते. म्हणून आम्ही त्यांना रिक्षातून खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यावर दुस-या रिक्षातून पदमावती परिसरात बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचे नातेवाईकाचा शोध लागला होता. त्यांच्या नातेवाईकांनी नंतर डॉ. बोरा यांच्याकडे नेले. आजोबांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करणे, हेच आमच्या दोघींचा मनात असल्याने व ते पूर्ण झाल्याने ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितले नाही, असे साळवे यांनी सांगितले.
'त्या' दोन रणरागिणींच्या सतर्कतेमुळे आजोबांना मिळाले उपचार, आदर्श वर्तनाचा धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 1:16 PM