जादा पाणी मागायला धजावेना महापालिका; मंत्र्यांपुढे पदाधिकारी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 06:01 AM2018-10-12T06:01:49+5:302018-10-12T06:02:01+5:30
शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे.
पुणे : शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे महापालिकेतील पदाधिकारी हतबल झाल्याचेच चित्र स्पष्ट झाले आहे. हे पत्र अतिरिक्त आयुक्तांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना पाठवले आहे.
त्याआधी पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. त्यात कालवा समितीत महापालिकेने १ हजार १५० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी तंबीच दिली आहे. महापालिका प्रशासनाने त्या पत्राची दखलच घेतली नाही. पाणी उचलणे सुरूच राहिले. त्यामागे ते काहीच करणार नाहीत, अशीच खात्री होती. मात्र, यावेळी पाटबंधारे विभागाने थेट पोलीस घेऊनच पंप बंदच करून टाकले. त्याची माहितीही महापालिकेला दिली नाही.
पंप बंद होऊन विरोधक तसेच पाणी न मिळालेल्या भागाचा रोष वाढू लागल्यावर पदाधिकाºयांना जाग आली. मात्र त्यातही सूसंगती दिसत नाही. सांगताना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी महापालिकेच्या पाण्यात कपात झालेली नाही. आधी घेत होतो तेवढेच म्हणजे १ हजार ३५० एमएलडीच पाणी मिळणार आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात महापालिकेने पाटबंधारे खात्याला पाठवलेले पत्र मात्र दिवाळीपर्यंत थांबा व नंतर आम्हीच १ हजार १५० एमएलडी पाणी घेऊ, असे विनंती करणारेच आहे.
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे पत्र लिहिले आहे. तेही त्यांचे कालवा समितीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा, अशी तंबी देणाºया पत्रानंतर बºयाच दिवसांनी लिहिलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. अशावेळी पाणी पुरवठा कमी झाला तर नागरिकांचा रोष होईल. आम्ही १ हजार १५० एमएलडी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करू व दिवाळीनंतर तेवढेच पाणी घेऊ, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.