पुुणे: भारतीय लोकशाही भक्कम करण्याचे कार्य निवडणुकांमुळे होते.त्यामुळे पंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया आहे,असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शनिवारी केले.तसेच स्थानिक नेतृत्व बळकट करून सत्तेचे समान वाटप करण्यासाठी भारतामध्ये त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारण्यात आली आहे,असेही त्यांनी नमूद केले. राज्य निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त कार्यालय तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सहारिया बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर,अॅड. भास्करराव आव्हाड आदी उपस्थित होते. सहारिया म्हणाले, निवडणुक आयोगासमोर सर्व उमेदवार समान असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे.उमेदवारांनी चरित्र पडताळणी, प्रतिज्ञापत्र तसेच निवडणुकांच्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे. १९९२ मध्ये ऐतिहासिक घटनादुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांना लोकशाहीमध्ये महत्त्व प्राप्त झाले. आयोगातर्फे घेण्यात येणा-या सर्वच निवडणुका पारदर्शीपणे घेण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे. राजकीय पक्षांनी लोकशाहीतील बंधने पाळणे आवश्यक असून निवडणुक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालनही त्यांनी करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य निवडणूक आयोगांना समान अधिकार देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची तरतूदही घटनेत आहे.घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर २०१७ पासून निवडणूक आयोगातर्फे नियमितपणे विविध कार्यशाळांचे आयोजित केले जाते. अजूनही अनेक तरूण निवडणूक प्रक्रियेच्या प्रवाहात आले नाहीत. त्यामुळे सर्व मतदारांची नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणुक आयोग प्रयत्नशील आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा.विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांनी मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी, अशीही सूचना सहारिया यांनी यावेळी केली.कार्यशाळेच्या माध्यमातून निघणा-या निष्कर्षांचा लोकशाहीसाठी प्रभावीपणे वापर करण्यात येईल. कार्यशाळेत होणारे विचारमंथन हे चांगल्या समाजासाठी आणि चांगल्या व सशक्त लोकशाहीसाठी उपयोगी ठरेल,असा विश्वासही सहारिया यांनी व्यक्त केला.
पंचवार्षिक निवडणुका लोकशाहीचा मुख्य पाया : राज्य निवडणुक आयुक्त ज.स. सहारिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 2:42 PM
भारतीय लोकशाही भक्कम करण्याचे कार्य निवडणुकांमुळे होते.त्यामुळे पंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया आहे..
ठळक मुद्देचरित्र पडताळणी, प्रतिज्ञापत्र तसेच निवडणुकांच्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आयोगातर्फे घेण्यात येणा-या सर्वच निवडणुका पारदर्शीपणे घेण्याचे प्रयत्नकार्यशाळेच्या माध्यमातून निघणा-या निष्कर्षांचा लोकशाहीसाठी प्रभावीपणे वापर