भात खाचरे वाचविण्यासाठी शेतकरी केविलवाने प्रयत्न करताना दिसत असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेगांव तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. हंगामाच्या सुरवातीस वाट पाहावयास लावणा-या पावसाने जुलैच्या अखेरीस जनजीवनच विष्कळीत करून टाकले आहे. तालुक्याच्या दुर्गम भागातील भीमाशंकर,आहुपे व पाटण खोऱ्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. आजपर्यंत या भागात ४६७ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. गोहे, कोंढवळ आहुपे या भागात बांध खचून शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यंदा पावसाने सुरवात चांगल केल्याने भात वाफे चांगले ऊगवून आले होते. काही ठिकाणी पावसाळ्याच्या सुरूवातीसच लागवडी सुरू केल्या होत्या. मात्र, मध्यंतरीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणचे शेतकरी भातलागवडीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत होत. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पावसाने चांगली सुरूवात केल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून शेतक-यांचे हात भातलागवडीसाठी सरसावले होते. मात्र बुधवारी रात्री या भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे या भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भातखाचरे वाहून गेली आहेत. लागवड केलेली क्षेत्रे माती खाली दडपली गेल्याने लागवड केलेले भात वाया गेले आहे.
सोबत फोटो,
पी४-आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.