डेहणे पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याने दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना भीमाशंकर अभयारण्यात येलवळी (ता. खेड) येथे शनिवारी घडली.रखरखीत उन्हाचे चटके मानवाप्रमाणे वन्यप्राण्यांनाही बसत आहेत. अन्न -पाण्याच्या शोधात ते सैरभैर झाले असून, त्यांच्यावरही जंगल सोडून भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.सुभाष डोळस यांना त्यांच्या मालकीच्या विहिरीत डोकावून पाहिल्यावर दोन भेकर जातीची हरणं पाण्यात पडली असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ही घटना भीमाशंकर वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवली. वनरक्षक के. के. दाभाडे व वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने मृत हरणांना पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. भीमाशंकर, भोरगिरी, येळवळी या परिसरात भेकर जातीची हरणे, ससे, सांबर असे अनेक प्राणी अधिवास करत आहेत.भीमाशंकर अभयारण्यात मात्र आता हेच जंगली प्राणी सुरक्षित नसल्याची परिस्थिती या घटनेतून पाहायला मिळत आहे. कधी या प्राण्याची शिकार केली जाते, तर कधी पाण्याअभावी मृत्यू होतात. या प्राण्यांच्या सुरक्षितता तसेच संगोपनाची जबाबदारी वनविभागाकडे असतानाही प्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे तक्रार करूनही या परिसरात पाणवठे उभारले गेले नसल्याचा आरोप प्रदीप चव्हाण,धोंडू बाणेरे, खंडू बाणेरे, शंकर बाणेरे,राजू बानेरे,सुभाष डोळस, दशरथ बाणेरे, गौतम डोळस, लहू मेठल हे स्थानिक नागरिक करत आहे.काही प्राणी मानवीवस्त्यांकडे कूच करीत आहेत. त्यात हरणांच्या प्रजातींचाही समावेश आहे. भीमाशंकर अभयारण्यात डोंगराळ भाग अधिक आहे. हरणांच्यासह वन्यजिवांच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्यालगत असणाºया दाट झाडीत, नदीकाठच्या झाडीत विविध प्राण्यांसह पक्ष्यांचा कायम वावर आहे. मार्च, एप्रिलमध्ये सैरभैर होणारे वन्यजीव या वेळी मानवीवस्तीकडे धाव घेऊ लागले.पाणवठे कागदावरचभीमाशंकर अभयारण्यांतर्गत येणारा निधी या परीक्षेत्रात वन्यप्राण्यांना पाणवठे,आगीपासून संरक्षण करण्यासाठी जाळपट्टे काढणे,नवनवीन तलाव बांधणे,आवश्यक ठिकाणी जाळीचे कंपाउंड करणे,वन्यप्राण्यांना निवारा तयार करणे आदी अत्यावश्यक कामावर खर्च करण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असूनही गेल्या काही वर्षांत वनविभागाच्या अधिकाºयांकडूनच यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने फक्त कागदोपत्री कामं दाखवली जात आहेत.या परिसरातील भोरगिरी,येळवळी,निगडाळे या वनसमित्यांनी अनेकदा मागणी करूनही वनविभागात कुठे खर्च केला, याची माहिती दिली जात नाही. कोट्यवधी रुपये खर्च झाले परंतू वनविभागाच्या हद्दीत प्राण्यांना निवारा तर नाहीच, परंतु शिकार मात्र राजरोसपणे सुरु आहेत.कागदावर शेकडो पाणवठे असून पाण्यासाठी भटकंती करताना वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव तर जाळपट्टे काढूनही जंगलं आगीत भस्मसात कशी होताहेत, हाच खरा प्रश्न आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी हरणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:04 AM