पुणे : गुप्तचर यंत्रणा आणि सैन्य कारवाया या हातात हात घालून कार्य करीत असतात. कुठलीही सैन्य कारवाई असो तिचे यश हे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या गोपनीय माहितीवर अवलंबून असते. ही माहिती आम्हाला इंटेलिजन्स ब्यूरो आणि रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’ या गुप्तचर संस्थांकडून मिळत असते, असे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख आणि भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पाय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी रॉचे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, गुप्तहेर हा नेहमीच पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्य करीत असतो. त्यांनी दिलेली माहिती ही देशासाठी तसेच सैन्यदलासाठी मोलाची असते. या पुस्तकात रॉचे निर्माते आर. एन. काव यांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे.
‘रा’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन म्हणाले, भारतीय गुप्तचर विभागाने अनेक मोहिमा यशस्वी केल्या; मात्र त्यांच्या मोहिमांची माहिती देणारी कुठलीच कागदपत्रे उघड करण्यात आलेली नाहीत. पाकिस्तानविरोधात जिंकलेली युद्धे, बांगलादेशाची निर्मिती, आॅपरेशन गोल्डन टेम्पल यासारख्या मोहिमांत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. आज रशिया, अमेरिका, इंग्लंड यासारखे देश त्यांच्या गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांच्या माहितीची कागदपत्रे एका ठराविक काळानंतर उघड करतात. आपल्याकडेही युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता ही माहितीपत्रे उघड व्हायला हवी.निवड प्रक्रियेत बदल व्हावाच्उमराणीकर म्हणाले, आर. एन. काव यांनी रॉची स्थापना केली. ही संस्था त्यांनी उभी करताना देशहित जपले. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या.च्एखादा शिक्षित हा चांगला गुप्तचर असेलच असे नाही. यामुळे ‘रॉ’साठीच्या निवड प्रक्रियेत बदल व्हावा, अशी अपेक्षा ‘रॉ’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन यांनी व्यक्त केली.