मेट्रोस्टेशनमुळे धान्य गोदामाला हवीय शासकीय दूध योजनेची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:52 PM2018-05-15T13:52:47+5:302018-05-15T13:52:47+5:30
अन्न धान्य वितरण विभागाच्या धान्य गोदाम जागेचा शोध अजूनही सुरू आहे. आता, पुरवठा विभागाने गेट जवळील शासकीय दूध योजनेची जागा मिळण्याचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे.
पुणे : शिवाजीनगर परिसरातील धान्य गोदामाच्या जागेत महामेट्रोचे मुख्य स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेतील धान्य गोदाम, सेतू सेवा केंद्र, निवडणूक आणि पुरवठा विभागाची गोदामे अन्यत्र स्थलांतरित केली जात आहेत. मात्र, अन्न धान्य वितरण विभागाच्या धान्य गोदाम जागेचा शोध अजूनही सुरू आहे. आता, पुरवठा विभागाने गेट जवळील शासकीय दूध योजनेची जागा मिळण्याचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सोमवारी महामेट्रोबरोबरच विविध विकास कामांचा व शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महामेट्रोचे प्रकाश पाटील, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी विश्वनाथ विरनक यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील धान्य गोदामे महामेट्रोसाठी दिल्यास पुरवठा विभागाला धान्यसाठा करण्यास गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे धान्य गोदामासाठी मरिआई गेट जवळील शासकीय दूध योजनेची अनुक्रमे पंधराशे आणि साडेतीन हजार अशी एकूण पाच हजार चौरस फुट जागेच्या मागणीचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अपर सचिवांकडे गेल्या आठवड्यात पाठविला आहे. या जागेचा उपयोग धान्य साठविण्यासाठी आणि जप्त केलेले धान्य ठेवण्यासाठी केला जाणार आहे.
पुरवठा विभागाच्या भोसरीसोडून इतर सर्व परिमंडळ कार्यालयांची स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. पुरवठा विभागाच्या अकरा परिमंडळांपैकी शिवाजीनगर येथील कोथरुड येथील कार्यालये शिवाजीनगर येथील पासलकर भवन येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. तर, पर्वती येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत होणार आहे. हडपसरचे कार्यालय ससाणेनगर, हिंगणेमळा येथील महापालिकेच्या क्रीडा संकुल येथे, कॅन्टोन्मेंटचे कार्यालय पुणे रेल्वे स्थानकाच्या एस. टी महामंडळाच्या जागेत स्थलांतरीत होणार आहे. भोसरी येथील ह्यफह्ण कार्यालयाचे स्थलांतर करण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेचे भाडे परवडत नसल्याचे कारण महामेट्रोने दिले आहे,असे अन्न धान्य पुरवठा विभागाचे शहर सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी विश्वनाथ विरनक यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून पुरवठा विभागाला गोदामे आणि कार्यालयांसाठी कायमस्वरुपाची जागा मिळत नाही, तोपर्यंत स्थलांतरीत करण्यात आलेल्या जागांचे भाडे महामेट्रोच भरणार आहे. संदर्भातील करार महामेट्रोबरोबर करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील गोदामाची जागा लवकरच महामेट्रोसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
................
पालकमंत्री गिरीश बापट यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिवाजीनगर येथील कार्यालये स्थलांतरित करून दोन महिन्यात मेट्रोला जागेचा ताबा देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे कोरेगाव पार्क येथे धान्य गोदामे स्थलांतरीत केली जाणार होती. परंतु, फुड कॉपोर्रेशन आॅफ इंडियाने (एफसीआय) धान्य गोदामांना जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे गोदामांच्या जागेसाठी आता शासकीय दूध योजनेच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.