ओझर : काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती अशा जीवघेण्या प्रसंगातुन एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुर डेपोची नाशिक - कोल्हापुर ही (एमएच- 09- एट-1876 ) क्रमांकाची गाड़ी गुरुवारी (दि.३१) सकाळी सहा वाजता नाशिकवरुन कोल्हापुरला जाण्यासाठी निघाली होती. ही बस नारायणगावच्या पुढे गाड़ी आलेली असताना जुन्नर येथील नवरंग मेडिकलचे मालक आलोक जंगम या तरुणाने शिवशाही बसच्या मागील डाव्या बाजुच्या चाकाचे बोल्ट निखळलेले पाहिले. आलोकने गंभीर अपघाताचा धोका ओळखून सतर्कता दाखवत चालकाला या गोष्टीची कल्पना देण्यासाठी शिवशाहीचा पाठलाग सुरु केला. भरधाव वेगात असलेल्या शिवशाहीला अखेर एकलहेरे गावाजवळ जीव धोक्यात घालून त्याने थांबविले. तोपर्यंत चाकाचे सहा बोल्ट पूर्ण निखळून गेले होते. चालक, वाहक व प्रवासी यांनी गाडीच्या खाली उतरुन मागील चाकाची वस्तुस्थिती पाहिल्यावर अक्षरश: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका भयानक अपघातातुन आलोक या तरुणाने आपल्याला वाचविले तो देवदुताच्या रुपात धावून आला असल्याच्या भावना त्यांनी व गाडीतील प्रवाशांनी व्यक्त केल्या. यावेळी गाडीमधे १७ प्रवाशी होते . ..........................आमचे नशीब बलवत्तर म्हणुन आम्ही सर्व जीवघेण्या अपघातातुन वाचलो गाड़ी अजुन काही मीटर जरी पुढे धावली गेली असती तर गाडीचे चाक पूर्ण निखळून भीषण अपघात झाला असता चाकाचे फक्त तीन बोल्ट राहिले होते चालक एस आर भोसले यांनी नाशिक वरुण गाड़ी निघताना चारही चाके सुस्थितित असल्याची खात्री केली होती असे त्यांनी सांगितले. -
शिवशाहीचे वाहक ए. जे. चौगुले ........................ शिवशाहीची पाठलाग करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण सकाळी 9 च्या दरम्यान पुणे- नाशिक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांंची गर्दी असते मी रस्त्यावर कसरत करुण गाडीचा पाठलाग केला. जीव धोक्यात घातला परंतु, शिवशाहीला मोठ्या अपघातातुन वाचविल्याचे मला समाधान आहे -आलोक जंगम.