फनी चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:34 PM2019-05-02T21:34:54+5:302019-05-02T21:37:43+5:30
‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
पुणे : ‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
पश्चिम बंगाल व ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवर शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर नागरी विमान वाहतुक महासंचालनालयाने (डीजीसीए) भुवनेश्वर व कोलाकाताला जाणाऱ्या व तिथून उड्डाण करणाऱ्या विमानांवर पुढील दोन दिवस बंधने घातली आहेत. कोलकाता येथील विमानतळावरून दि. ३ मे रोजी रात्री ९.३० ते दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ या कालावधीत आणि भुवनेश्वर येथील विमानतळावरून दि. ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून रात्री ११.५९ पर्यंत सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यादरम्यान या दोन शहरांकडे जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पुणे विमानतळावरू भुवनेश्वरसाठी विमानसेवा उपलब्ध नाही. मात्र, कोलकातासाठी दररोज सहा विमानांचे उड्डाण होते. मध्यरात्री १२.१५, पहाटे २.५०, ५.३५, सकाळी ११.४०, आणि रात्री १०.३० व ११ यावेळेत पुणे विमानतळावरून कोलकाताला विमानाचे उड्डाण होते. ही उड्डाणे ‘डीजीसीए’च्या निर्णयानुसार संबंधित कालावधीत रद्द असतील.
विमानसेवेबरोबरच रेल्वे सेवेवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता पाहून पुढील दोन दिवसात रेल्वेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, त्यापुर्वी दक्षता म्हणून दि. २ मे रोजी पुणे व मुंबई येथून सुटणारी भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दि. ३ मे रोजी भुवनेश्वर-मुंबई एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. ही गाडी दि. ४ मे रोजी रात्री ११.४५ वाजता पुण्यात येते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.