क्लोन कॉपी देण्यास सहा महिन्यांचा कालावधी, नऊपैकी दोघांना कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:08 AM2019-07-19T04:08:44+5:302019-07-19T04:09:07+5:30
एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती.
पुणे : एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य केली; मात्र प्रत्यक्षात या क्लोनिंगची कार्यपद्धती प्रचंड वेळखाऊ असून, या खटल्यातील एकूण नऊ आरोपींपैकी केवळ दोन आरोपींनाच क्लोन कॉपी मिळाली आहे. उर्वरित आरोपींना क्लोन कॉपी मिळण्याकरिता किमान ६ महिन्यांचा कालावधी लागेल. अशी माहिती एल्गार प्रकरणातील आरोपींचे वकील राहुल देशमुख यांनी दिली.
गुरुवारी एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी होती. या वेळी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, न्यायालय परिसरातील एका हॉलमध्ये क्लोन कॉपीचे काम सुरू होते. खटल्याशी संबंधित व्यक्ती व वकील यांनाच त्या हॉलमध्ये जाण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत देशमुख यांना अधिक विचारले असता ते म्हणाले की, ‘या प्रकरणातील ९ आरोपींनी क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार त्यांना क्लोन कॉपी देण्याचे काम सुरू झाले. या प्रकरणी एकूण १८ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस आहेत. प्रत्येक डिव्हाईसची क्लोन कॉपी तयार होण्यास ६ तासांचा अवधी लागतो. प्रत्येक डिव्हाईसची कॉपी ९ आरोपींमध्ये देण्याकरिता लागणारा वेळ प्रचंड आहे. याकरिता न्यायालयाकडे आरोपींच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतरही क्लोनिंगची प्रक्रिया सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नव्हती.’
>वेळेची उपलब्धता पाहिल्यास यापुढे सहा किंवा वर्षभराचा काळ क्लोनिंग प्रक्रियेकरिता खर्ची पडेल, असे देशमुख यांनी सांगितले. एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी राहुल देशमुख, पार्थ शहा, सिद्धार्थ पाटील यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला.