रिकाम्या जागांचा ई-लिलाव, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:23 AM2017-10-27T01:23:59+5:302017-10-27T01:24:16+5:30
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रिकाम्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रिकाम्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ८ जागांसाठी ई-लिलाव (आॅनलाइन आॅक्शन) करण्यात येणार आहे. यामध्ये काही जागांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने रात्री बसगाड्या लावण्यासाठी पीएमआरडीएकडे मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पीएमआरडीएने पीएमपी प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे शासनाने पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर कार्यक्षेत्रात मोठी वाढ केली. सध्या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात दोन महापालिका, सात नगरपालिका आणि पाच तालुक्यांतील तब्बल ८६५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रातील सात हजार हेक्टर शासकीय आणि मोकळ्या जागा (अॅमेनिटी स्पेस) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर या ‘लॅण्ड बँके’च्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडून जमीन विल्हेवाट विनियम (लॅण्ड डिस्पोजल रुल) प्राधिकरणाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ जागांसाठी ई-लिलाव करण्यात येणार आहे.
>पीएमपी बसला रात्री थांबण्यासाठी जागा नाही
या जागेचा लिलाव जाहीर केल्यानंतर पीएमपी प्रशासनाकडून पीएमआरडीएला यांपैकी काही जागा रात्री पीएमपी बसगाड्या लावण्यासाठी मागण्यात आल्या. सध्या शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी आणि स्वारगेट या दोन आगारांमधून संपूर्ण पुणे शहर, उपनगर आणि काही ग्रामीण भागाच्या हद्दीपर्यंत पीएमपीच्या बसगाड्या दिवसरात्र धावतात. यांपैकी रात्रीच्या उशिराच्या बसगाड्यांना परतीचा प्रवास करताना थांबण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध नाही. यामुळे रात्रीच्या वेळी पीएमपीच्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी काही ठिकाणी जागांची नितांत गरज आहे. यासाठी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे रिकाम्या जागांची मागणी करण्यात आली आहे.