पुणे : उन्हाळयाचे दिवस आणि आंबा यांची गट्टी जमलेली दिसते. पिवळेधम्म आंबे साहजिकच आपले लक्ष वेधून घेतात. आंब्याची अवीट गोडी नाकारणे केवळ अवघडच. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ आली आहे. सातत्याने आणि जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने पोटदुखी, शरीतातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ, जुलाब असे त्रास उद्भवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आंबे संतुलित प्रमाणात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांंनी दिला आहे. आंब्याचा हंगाम सुरु असताना समोर आलेल्या फोडीला नकार देणे अवघड ठरते. पण तत्पूर्वी आपण या फळाबाबतचे समर्थक व विरोधी असे दोन्ही मुद्दे समजून घेणे आवश्यक असते.आंब्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी, लोह आदी घटक असतात. इतर फळांप्रमाणे त्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज असते व ग्लुकोजचे प्रमाण किंचित अधिक असते. नियमित व्यायाम करणा-यांनी क्वचित आंबा खाल्ल्यास तितकासा त्रास होत नाही. परंतु, वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्यांनी मात्र एक-दोन फोडींपेक्षा अधिक आंबा खाऊ नये. कोणतेही फळ दिवसातील दोन भोजनांपैकी एक म्हणून खाल्ल्यास सर्वोत्तम असते, कारण या फळातील साखर त्या भोजनानंतर शरीराकडून चरबीच्या रुपात साठवली जाण्याची शक्यता असते.आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलर्जी लक्षात येत नाही. त्यामुळे तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वर्षी अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नये, असेही सांगण्यात येत आहे.------------मधुमेही लोकांनी साखरेच्या नियंत्रणासाठी आंब्याचे सेवन एखाद्या फोडीपुरते व तेही न्याहारीच्या वेळी करावे. आदर्श वजन गटात असलेल्या बालकांना दोन भोजनांमधील कालावधीत एक आंबा स्नॅक म्हणून देण्यास हरकत नसते. क्रीडा प्रशिक्षणाचा कसून सराव करणा-या प्रौढ व्यक्ती कर्बोदकप्रधान आहारावर असतील तर त्यांनी व्यायामानंतरचे भोजन (प्राधान्याने सकाळी) म्हणून आंबा खावा.
आंबा खा, पण जरा जपून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:13 PM
सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देवाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ