तांदळाच्या चढत्या दरामुळे निर्यातीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 04:36 PM2019-02-12T16:36:13+5:302019-02-12T16:45:11+5:30
भारतातून इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब, बांगलादेश, नेपाळ आदी देशांमध्ये तांदळाची निर्यात होते.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तांदळाच्या निर्यातीमध्ये चढ उतार होत आहे.
पुणे: राज्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील बाजार पेठेत धान्याची विक्रमी आवाक होते. त्यानुसार बाजारात गहू,ज्वारी,बाजरीची आवक सुरू झाली आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यंदा तांदळाचे अधिक उत्पादन झाले आहे. मात्र, तांदळाचे दर वाढल्याने बासमती व बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये १४ टक्क्यांनी तर बासमतीच्या निर्यातीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे.
भारतातून इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब, बांगलादेश, नेपाळ आदी देशांमध्ये तांदळाची निर्यात होते.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तांदळाच्या नियार्तीमध्ये चढ उतार होत आहे. त्यात यंदा परतीचा पाऊस कमी झाला असला तरी सुरूवातीला पाऊस चांगला झाल्याने तांदळाचे चांगले उत्पादन झाले आहे.मागील वर्षी ९७५ लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते तर यंदा तांदळाचे उत्पादन ९९२ लाख टनापर्यंत वाढले आहे. बासमती तांदूळ केवळ भारतात आणि पाकिस्तानमध्ये काही भागात पिकवला जातो.त्यामुळे तांदळाचे दर वाढूनही बासमती तांदळाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झालेला नाही. मात्र,भारतात नॉन बासमती तांदळाचे दर वाढले आहेत.त्याचा परिणाम निर्यातीवर झालेला दिसून येत आहे.भारतापेक्षा कमी दरात इतर देशांमधून तांदूळाची निर्यात अधिक होत असल्याने देशातील बिगर बासमती तांदळावर परिणाम झाला आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशातून ४९.२५ लाख टन तांदळाची निर्यात झाली.परंतु,मागील वर्षी ५७ लाख टन तांदळाची निर्यात झाली होती.भारत तांदळाच्या नियार्तीमध्ये आजही प्रथम क्रमांकाचा देश आहे.परंतु,यंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे तांदळाची निर्यात वाढवणे गरजेचे आहे.तांदळाच्या आधारभूत किमतीत वाढ झाल्याने दरातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.परिणामी शेतकरी कमी किमतीत तांदूळ विकण्यास तयार नाहीत. त्यामुळेच केंद्र शासनाने तांदळाच्या निर्यातीसाठी ५ टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.परंतु,शासनाने १० टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावे,अशी अपेक्षा शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
दैनंदिन जीवनात तांदळाबरोबरच गहू,ज्वारी, बाजरी आदी धान्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.पुण्यात तांदळासह इतर धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते.पुण्यातील बाजारपेठेत नवीन धान्याची आवक सुरू झाली आहे.त्यात मध्य प्रदेशातून उज्जेन, रतलाम, देवास आणि इंदोर येथून लोकवन व सिहेरी गव्हाची आवक सुरू झाली आहे. गहू चांगल्या दर्जाच्या असून क्विंटलला २६०० ते ३००० हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्यात गव्हाची आवक वाढणार असली तरी दर स्थिर राहणार असल्याचे व्यापा-यांकडून सांगितले जात आहे. यंदा पाऊस कमी झाला असला तरी महाराष्ट्रात करमाळा, बार्शी, जामखेड-खर्डा या भागात ज्वारीचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण ज्वारी बाजारात दाखल झाली असून ज्वारीला क्विंटलला ३९०० ते ४६००रुपये दर मिळत आहे. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश व गुजरात राज्यातून बाजरीची आवक होत असून बाजरीला क्विंटलला २२०० ते २६०० रुपये दर मिळत आहे.