महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:46+5:302021-09-19T04:11:46+5:30
दुसऱ्या बाजूला समाजानेही महिलांना आत्मसन्मान द्यायला हवा. हुंडाबळीसारख्या समस्या, स्त्रीभ्रूणहत्येसारखी समाजामध्ये वेगाने पसरत चाललेली विकृती, पुण्यातील स्टेशनवरील घटना किंवा ...
दुसऱ्या बाजूला समाजानेही महिलांना आत्मसन्मान द्यायला हवा. हुंडाबळीसारख्या समस्या, स्त्रीभ्रूणहत्येसारखी समाजामध्ये वेगाने पसरत चाललेली विकृती, पुण्यातील स्टेशनवरील घटना किंवा मुंबईतील साकीानाक्यासारख्या घटनांनी भय इथले संपले नाही, हे पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत पुण्यातच घडलेल्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ला फिट ठेवून स्वयंपूर्ण व्हावे. व्यायामासारखा विषय महिलांच्या अजेंड्यावरच नसतो. हे क्षेत्र केवळ पुरुषांचे आहे, असा समज आहे. त्यामध्ये बदल व्हायला हवा. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू, पी. सिंधू यांनी भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला उत्तुंग कामगिरी बजावत आहेत. त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांच्या क्षमतांचा अधिक विकास करण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचीही गरज आहे.
आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाल्याशिवाय महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकणार नाहीत. आज समाजामध्ये आपण पाहतो की, कौटुंबिक हिंसाचारात होरपळलेल्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेल्या महिलांची संख्या तुलनेने जास्त आहे. पीडित महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक ताकदीची गरज असते. नोकरी, व्यवसाय करीत असतील तर त्यांच्यामध्ये आर्थिक स्वयंपूर्णता येते. त्यासाठी समाजात पोषक वातावरण तयार व्हायला हवे. यासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही. विविध स्वयंसेवी संघटना, नागरी समूह यांनी त्यासाठीचे उपक्रम राबवायला हवेत.
- दीप्ती अऱ्हाना