मंचर : मराठी भाषा मातृभाषा असली तरी तिला आपण ज्ञानभाषा बनवली पाहिजे. त्यासाठी साहित्यिकासोबत वैज्ञानिकांनी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले.
येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात मराठी विभाग व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन समारंभ' संपन्न झाला. या वेळी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य कानडे बोलत होते. या वेळी कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. के. सांगळे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. बी. निकुंभ, मराठी विभागप्रमुख प्रा. संतोष पवार, विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा. जे. ई. येवले आदी उपस्थित होते.
सिमेटचे माजी महासंचालक डॉ.दिनेश अमळनेरकर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘जागतिकीकरणामुळे आधुनिक काळात इंग्रजीचे महत्त्व वाढत असले तरी आपली मातृभाषा मराठीही तितकीच महत्त्वाची आहे. प्रशासकीय कार्यालयात व शिक्षण व्यवस्थेत मराठीचा वापर वाढणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मराठी भाषा केवळ व्यावहारिक देवघेवीचे साधन न बनता मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन सन्मानपूर्वक व्हायला हवे'. तसेच डॉ. अमळनेरकर यांनी आपल्या व्याख्यानातून भारतरत्न सी. व्ही. रामन यांचा जीवनपट उलगडून दाखविला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्य स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘अक्षरबन’ भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. दिनेश अमळनेरकर व प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्थानिक मराठी साहित्य चळवळीचा भाग म्हणून साहित्यिक शकील जाफरी, सूर्यकांत थोरात, विष्णू गुंजाळ यांनी आपली पुस्तके मराठी विभागास भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा महाकाळ यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. ए. बी. निकुंभ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रा. कैलास एरंडे आणि प्रा. एल. पी. कोल्हे यांनी परिश्रम घेतले.