पुणेकरांनी नाकारला इजिप्तचा कांदा !
By admin | Published: September 6, 2015 09:38 PM2015-09-06T21:38:12+5:302015-09-06T21:38:12+5:30
इजिप्तहून आयात केलेल्या कांद्याला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील बारा दिवसांत गुलटेकडी येथील मार्केटयार्डात इजिप्तच्या कांद्याची केवळ २० ते २२ टन एवढीच आवक झाली आहे
पुणे : इजिप्तहून आयात केलेल्या कांद्याला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील बारा दिवसांत गुलटेकडी येथील मार्केटयार्डात इजिप्तच्या कांद्याची केवळ २० ते २२ टन एवढीच आवक झाली आहे. व्यापाऱ्यांसह ग्राहकांनीही त्याच्याकडे पाठ फिरविल्याने स्थानिक मालाच्या भावावर फारसा परिणाम झाला नाही. रविवारी स्थानिक कांद्याच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा किलोमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली.
स्थानिक बाजारात कांद्याचे दर भडकल्यानंतर सरकारने अफगाणिस्तान व पाकिस्तानातून मालाची आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यातच मुंबईच्या व्यापाऱ्यांनी इजिप्तचा कांदा आयात केला. मुंबईत साधारण २० दिवसांपूर्वी तो दाखल झाला. पुण्याच्या बाजारपेठेत येण्यासाठी त्याला जवळपास आठ दिवसांचा कालावधी लागला. मार्केटयार्डात हा कांदा २६ आॅगस्टला आला. केवळ एकाच व्यापाऱ्याने येथे १० टन कांदा आणला. मात्र ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.
रविवारपर्यंत केवळ तीनवेळा २० ते २२ टन कांदा पुण्यात आला आहे. आकाराने मोठा व कोल्ड स्टोअरेजमधील हा कांदा लवकर खराब होत आहे.