आठशे लाभार्थ्यांच्या सदनिका केल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:08+5:302021-09-21T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथील गृहयोजनेसाठी लॉटरीद्वारे लाभार्थी निवडण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथील गृहयोजनेसाठी लॉटरीद्वारे लाभार्थी निवडण्यात आले होते. मात्र, वारंवार कळवूनही कागदपत्रे तपासणीसाठी हे लाभार्थी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना जाहीर झालेल्या सदनिका रद्द करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील ८०१ लाभार्थ्यांना आता ही संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना कागदपत्र तपासणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे पीएमआरडीएच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांनी सांगितले.
प्रतीक्षा यादीवरील लाभार्थ्यांची यादी http://lottery.pcntda.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना मेलद्वारे तात्पुरते वाटप पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच http://lottery.pcntda.org.in या संकेतस्थळावरही उपलब्ध केले आहे. लाभार्थी यूजरनेम व पासवर्ड वापरून संकेतस्थळावरून वापपत्र डाऊनलाेड करू शकतात.
कागदपत्रे तपासणीसाठी ऑनलाइन अपाँईंटमेंट घेण्याकरिता या लाभार्थ्यांना मेसेजद्वारे लिंक पाठविण्यात आली आहे. या लिंकवरून लाभार्थ्यांने कागदपत्रे तपासणीसाठी अपाँईंटमेंट निश्चित करता येईल. अथवा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे जुने कार्यालय सेक्टर २४, लोकमान्य टिळक चौक, निगडी येथे कागदपत्र तपासणी केंद्रावर जाऊन अपाँईंटमेंट निश्चित करता येणार आहे.
---
जे लाभार्थी या कालावधीत कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहणार नाहीत, अथवा कागदपत्र तपासणीमध्ये जे अपात्र ठरतील, त्यांचे सदनिका वाटप रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीवरील पुढील लाभार्थ्यांना सदनिका वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- स्नेहल बर्गे, सहआयुक्त, पीएमआरडीए.