नीलमच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे फाउंडेशन! एक लाखाची मदत, आणखी एक लाख देणार
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 28, 2023 06:10 PM2023-11-28T18:10:20+5:302023-11-28T18:12:27+5:30
आणखी एक लाख रूपये दाेन दिवसांत देणार असून नीलमच्या फुफ्फुस प्रत्यारोपण, औषधाेपचारासाठीही फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत...
पुणे : दाेन्ही फुप्फुस निकामी झालेल्या आणि फुप्फुस प्रत्याराेपणाची आवशकता असलेल्या ससून रुग्णालयातील नीलम जाधव या अत्यंत गरीब तरूणीच्या उपचारासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशन सरसावले आहे. नीलमच्या वैद्यकीय खर्चासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने प्रमोद नाना भानगिरे यांनी ससूनमध्ये जाउन एक लाख रुपयांची तत्काळ मदत केली. आणखी एक लाख रूपये दाेन दिवसांत देणार असून नीलमच्या फुफ्फुस प्रत्यारोपण, औषधाेपचारासाठीही फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सातारा येथील गरीब कुटूंबातील नीलम ही तरूणी फुप्फुस निकामी झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ससूनमध्ये श्वसनविकार विभागात ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. याबाबत दैनिक ‘लाेकमत’ ने ‘पाेरीचं फुप्फुस निकामी झालंय, आता ट्रान्सप्लांटसाठी ४० लाख उभारू कसे?’ या मथळयाखाली मंगळवारी दि. २८ नाेव्हेंबर राेजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले हाेते. हे वृत्त वाचून हे फाउंडेशन पुढे आले आणि त्यांनी ससूनमध्ये येउन कुटूंबियांशी चर्चा करत सढळहस्ते नीलमच्या उपचारासाठी मंगळवारी आर्थिक मदत तिच्या पित्याकडे सुपूर्त केली. यावेळी नीलमचे वडील नानासाहेब जाधव, लहान बहीण पल्लवी व सामाजिक कार्यकत्या दिलशाद अत्तार उपस्थित होत्या.
यावेळी एकनाथ शिंदे फाउंडेशनचे प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, नीलमला आम्ही फाउंडेशनच्या वतीने फुप्फुस प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यासाठी फाउंडेशन ची टीम सातत्याने प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सेवेच्या मार्गांवरच एकनाथ शिंदे फाउंडेशन मार्गक्रमण करत आहे. या आर्थिक मदतीबाबत नानासाहेब जाधव यांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.