पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश शुक्रवारी राज्य सरकारने जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेऊन राजकीय ऑपरेशन केले आहे. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्याने राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. या निर्णयाचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेत २०१७ साली ११ गावे आणि त्यांनतर २३ गावांचा समावेश केला गेला. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपरिषद घाेषित झालेल्या गावात राष्ट्रवादीचे गणेश ढोरे हे नगरसेवक होते. महापालिकेच्या आगामी प्रभागरचनेत या गावांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त निवडून आले असते. त्याला ब्रेक लावण्यासाठीच भाजप आणि शिवसेना यांनी रणनीती तयार करत वरील दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषदेचा निर्णय ठरणार डोकेदुखीचा
दाेन गावांची नगरपरिषद करण्याच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अन्य गावांमधूनही स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी जाेर धरेल. त्याचबरोबर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधून अशा प्रकारांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारला हा निर्णय डोकेदुखीचा ठरणार आहे.
शिवतारेंना फायदा!
या निर्णयाचा राजकीय फायदा शिवसेना आणि भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या निर्णयासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते. नगरपरिषदा झाल्यामुळे येथील वॉर्ड लहान होणार आहेत. लहान वॉर्ड असल्याचा फायदा शिवसेना अर्थात विजय शिवतारे यांना अप्रत्यक्षरीत्या होणार आहे.
पुणे महापालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –
फुरसुंगी – स. नं. १९३, १९२ पै, १९४, १९५ पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.
उरूळी देवाची – स. नं. ३०, ३१ व ३२ पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.
पुणे महापालिकेची सुधारित हद्द
उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुली गांवाची हद्द
उत्तर पूर्व – लोहगाव, वाघोली या महसुली गावांची हद्द
पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसुली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द
दक्षिण पूर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसुली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द
दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसुली गावांची हद्द
दक्षिण-पश्चिम : पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसुली गावांची हद्द
पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बुद्रुक व खुर्द, म्हाळुंगे, सूस या महसुली गावांची हद्द
पश्चिम-उत्तर : बाणेर, बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महापालिकेची जुनी हद्द